Udadache papad : पापड फाटतात काय? मग, 'या' सोप्या पद्धतीनं उडीद पापड बनवा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हाळ्याचे दिवस संपत येत असून, लवकरच पावसाळा सुरू होत आहे. काही ठिकाणी तर वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, माहिलांची तिखट, लोणची, शेवया, वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पापड आणि तांदळाच्या पापड- कुरडई बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. याच दरम्यान खास करून लहानापासून ते मोठ्यापर्यत आवडणारे उडीदाचे पापड बनवले जाते. मात्र, हे पापड बनवताना काळजी घेतली नाही तर ते फाटतात किंवा तुटतात. यामुळे जाणून घेवूया सोप्या पद्धतीने ते कसं बनवायचे…. ( Udadache papad )
साहित्य-
उडीद डाळीची पीठ- ७ कप
हिंग पावडर – एक चमचा
कुटलेली काळीमिरी – १- २ चमचा
पापडखर – ५ चमचे
मीठ- एक चमचा
पाणी- आवश्यकतेनुसार
कृती-
१. प्रथम ७ कप उडीदाच्या डाळींचे पीठ घेवून ते चाळणीने चाळून घ्यावे.
२. ज्या कपाने डाळींचे पीठ मापून घेतले आहे त्याच कपाने एका भांड्यात दोन कप पाणी घालावे.
३. पाण्याचे भांडे गॅसवर ठेवून पाणी गरम करावे आणि नंतर गॅस बंद करावा.
४. या पाण्यात खलबत्यात कुटून घेतलेली काळी मिरी, पापडखर, मीठ आणि हिंग पावडर घालून चांगले हलवावे.
५. यानंतर हे मिश्रण थंड होण्यास बाजूला ठेवावे.
६. मिश्रण कोमट झाल्यावर चाळलेल्या पीठात थोडं- थोडं घालून पीठाचा घट्ट गोळा तयार करावा. (आवश्यक असल्यास पाणी घालावे)
७. हा गोळा ५ ते ६ तासासाठी एका पॅक बंद भांड्यात भिजत ठेवावा.
८. सहा तासानंतर भिजत ठेवलेला गोळा घेवून पुन्हा तेल लावून खलबत्यात चांगला मऊ होऊपर्यत कुटावा. हाताला तेल लावून पीठ जोरजोरात मळून घ्यावे.
९. र मऊ झालेल्या पीठाचे छोटे- छोटे गोळे तयार करून पोळपाटावर लाटावे.
१०. पापड लाटताना पोळपाटाला तेल किंवा पीठाचा वापर करावा. मात्र, जास्तीच्या पीठाचा वापर करू नये. ( यावेळी पापड फाटू नये म्हणून हलक्या हाताने सर्व बाजूनी लाटावे.)
११. तयार झालेले पापड उन्हात वाळवावेत.
१२, यानंतर एका कढाईत तेल घालून त्यात पापड तळून घ्यावेत. किंवा तव्यावर भाजून घेतले तरी चालते. ( Udadache papad )
हेही वाचा :