कर्नाटकची निवडणूक देशाला दिशा देणारी ठरेल : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

कर्नाटकची निवडणूक देशाला दिशा देणारी ठरेल : पृथ्वीराज चव्हाण

खडकलाट; पुढारी वृत्तसेवा : यंदाची कर्नाटकातील विधानसभेची निवडणूक केवळ कर्नाटकाच्यादृष्टीने नसून देशाच्यादृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीनंतर लागलीच राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे कर्नाटकाची निवडणूक देशाला दिशा देणारी ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. येथे चिकोडी-सदलगा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, प्रत्येक कामात 40 टक्के कमिशन असलेल्या भ्रष्ट भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. भ्रष्ट भाजपला जनताच धडा शिकवेल. देशात परिवर्तनाला सुरुवात होईल. चिकोडी-सदलगा मतदारसंघात आ. प्रकाश हुक्केरी व आ. गणेश हुक्केरी यांनी मोठ्याप्रमाणात विकासकामे राबविली आहेत. निवडणुकीत आ. गणेश हुक्केरी यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसच्या नेत्यांमुळेच उन्हाळ्यात कृष्णा नदीला 3 टीएमसी पाणी सोडले जात आहे. आपण कृष्णा नदीपासून 21 कि. मी. कालव्यास पाण्याची सोय करून शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले आहे. समुदाय भवने, मंदिरांचा जीर्णोद्धार, रस्ते, वीज, पाणी व मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या आहेत. विकास कामांच्या जोरावर गणेश हुक्केरी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील, सुनील शिंदे, वैशाली कमते, ग्रा. पं. अध्यक्षा यल्लव्वा गावडे, उपाध्यक्ष कुमार पाटील, सदस्य राकेश चिंचणे, नासर तहसीलदार, आर. बी. थरकार, सुनील पाटील, सुभाष कुंभोजे, वासू गावडे, गंगाराम पुजारी, सुदाम थरकार, अजित माळकरी, रजनीकांत वराळे, मिथून वराळे आदी उपस्थित होते. बंडा सरदार यांनी आभार मानले

Back to top button