Dr. Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिस्तूप ठरताहेत अखंड ऊर्जेचा स्रोत | पुढारी

Dr. Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिस्तूप ठरताहेत अखंड ऊर्जेचा स्रोत

नाशिक, नितीन रणशूर : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२ वी जयंती (Dr. Ambedkar Jayanti)  असून, आजही ते करोडाे भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांच्या अनुयायांकडून आजही या महामानवाची प्रत्येक आठवण, त्यांनी वापरलेल्या वस्तू मौल्यवान ठेवा म्हणून जतन केले जात आहे. महापरिनिर्वाणानंतर काही मोजक्याच अनुयायांकडे महामानवाच्या अस्थी जपून ठेवण्यासाठी देण्यात आल्या होत्या. त्यात नाशिक जिल्ह्यातील सय्यद पिंप्री, आडगावसह शहरातील रमाई आंबेडकर शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ बाबासाहेबांच्या अस्थींचे स्मारक स्तूप उभारण्यात आले आहे. हे तिन्ही स्मारक भीम अनुयायांसाठी प्रेरणास्थान तसेच अखंड ऊर्जेचे स्रोत ठरत आहे. १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरला या ठिकाणी अनुयायांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या स्मारकांचे सुशोभीकरण व पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी भीम अनुयायांकडून होत आहे.

सय्यद पिंप्री स्तूप स्मारक | Dr. Ambedkar Jayanti

येथील पी. एल. लोखंडे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक होते. लोखंडे आणि बाबासाहेबांमध्ये खूप सख्य होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थी जपून ठेवण्याचे भाग्य लोखंडे यांना लाभले. मुंबईच्या चैत्यभूमीत १९७१ मध्ये बाबासाहेबांच्या अस्थींचे स्मारक बांधण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच म्हणजे १९५८ मध्येच सय्यद पिंप्री येथे लोकवर्गणीतून स्मारक उभारण्यात आले होते. महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचे पहिले स्तूप स्मारक सय्यद पिंप्रीचे ठरले. तत्कालीन खासदार दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते येथील स्मारकाचे उद्घाटन झाले होते. या सोहळ्याला आंबेडकरांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांची विशेष उपस्थिती होती. मुकुंदराव आंबेडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेले बोधिवृक्ष आजही या ठिकाणी आहे.

आडगाव राजवाड्यातील स्तूप स्मारक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आडगावसोबत नेहमी ऋणानुबंध राहिला होता. जमिनीच्या केससंदर्भात बाबासाहेब अनेकदा आडगावला येऊन गेले हाेते. काळाराम मंदिर सत्याग्रहावेळी काही काळ बाबासाहेबांनी आडगावमधील जीवलग मित्र पुंजाजी नवासाजी जाधव यांच्याकडे वास्तव्य केले होते. महापरिनिर्वाणानंतर जाधव यांनी बाबासाहेबांच्या अस्थी आडगावला आणून साडेनऊ वर्षे जतन करत अस्थी स्तूप स्मारकाची उभारणी केली. ७ एप्रिल १९६६ ला ब्रह्मदेशातून आलेले भदंत वज्रबोधी यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला दादासाहेब गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या या स्मारकासाठी तत्कालीन देणगीदारांनी सढळ हाताने मदत केल्याची नोंद आहे.

रमाई कन्या विद्यालयातील ‘चैतन्य स्तूप’

नाशिक शहरातील जुना आग्रा महामार्गावरील रमाई कन्या विद्यालयातील ‘चैतन्य स्तूप’ आंबेडकरी चळवळीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. बाबासाहेब आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. बाबासाहेबांच्या अखेरच्या प्रवासापर्यंत दादासाहेब त्यांच्यासोबत होते. महापरिनिर्वाणानंतर दादासाहेबांनी बाबासाहेबांचा अस्थिकलश नाशिकमध्ये आणला. दादासाहेबांच्या निधनानंतर कर्मयोगिनी डॉ. शांताबाई दाणी यांनी बाबासाहेबांच्या अस्थींचे जतन करत ‘चैतन्य स्तूप’ उभारले. १४ एप्रिल १९९५ रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी, २४ डिसेंबर १९९२ रोजी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी स्तूपला सदिच्छा भेट दिली होती. याच ठिकाणी बाबासाहेबांच्या ड्रेस, बूट, टोपी आदी साहित्यांचेही जतन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button