

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुक्रवारी (दि.१४) मोठ्या धूमधडाक्यात साजरी होणार आहे. महामानवाच्या जयंतीसाठी शहरासह उपनगरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, निळे झेंडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. जयंतीमुळे भीमसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
'भीम महोत्सवा'साठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष तसेच सार्वजनिक मंडळाकडून आंबेडकर जयंतीसाठी जोर लावला आहे. विशेष म्हणजे यंदा महापालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याने या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिकसह नाशिकरोड सार्वजनिक आंबेडकर जयंती उत्सव समितीने उभारलेले आकर्षक देखावेही सर्वसामान्यांसाठी खुले केले आहे.
डाॅ. आंबडेकर जयंतीमुळे भीमसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. आंबेडकरी अनुयायांकडून घरांवर तसेच इमारतींवर निळे तसेच पंचशील ध्वज लावण्यात आले आहे. काहींनी घरे व इमारतींवर निळी पताका तसेच विद्युत रोषणाई केली आहे. विविध वाहने, रिक्षा, शहरातील चौका-चौकांमध्ये निळ्या रंगाचे ध्वज लावून वातावरण निर्मिती केल्याने संपूर्ण शहर निळेमय झाले आहे. दरम्यान, महामानवाची जयंती शांततेत साजरी करावी, तसेच सामाजिक सलोखा जपावा, असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील नेत्यांकडून करण्यात आले आहे.
आकर्षक विद्युत रोषणाई
'भीम महोत्सवा'निमित्त शहरासह उपनगरांमधील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच रंगरंगोटी करण्यात आली आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठांचेही कामही पूर्ण झाले आहे. पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, अंबड, सिडको, पाथर्डीगाव, उपनगर, मोठा राजवाडा, जेलरोड आदी परिसरात भीमजयंतीच्या शुभेच्छा देणाऱ्या मोठमोठ्या स्वागत कमानी तसेच फलक उभारण्यात आले आहेत.
हेही वाचा :