मार्चमध्ये जीएसटी करवसुली १३ टक्क्यांनी वाढली, संपूर्ण आर्थिक वर्षात १८.१० लाख कोटी रुपयांचे करसंकलन | पुढारी

मार्चमध्ये जीएसटी करवसुली १३ टक्क्यांनी वाढली, संपूर्ण आर्थिक वर्षात १८.१० लाख कोटी रुपयांचे करसंकलन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  सरत्या मार्च महिन्यात जीएसटी करवसुलीत 13 टक्क्यांची वाढ झाली असून मार्चमध्ये 1 लाख 60 हजार 122 कोटी रुपयांचे करसंकलन झाले असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून शनिवारी सांगण्यात आले. जुलै 2017 मध्ये जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली होती. तेव्हापासूनचे हे दुसरे सर्वात जास्त मासिक करसंकलन आहे.

मार्चमध्ये केंद्रीय जीएसटीच्या माध्यमातून 29 हजार 546 कोटी रुपये, राज्य जीएसटीच्या माध्यमातून 37 हजार 314 कोटी रुपये तर आय-जीएसटीच्या माध्यमातून विक्रमी 82 हजार 907 कोटी रुपयांचे करसंकलन झाले. आय – जीएसटीमध्ये आयात कराच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या 42 हजार 503 कोटी रुपयांचा समावेश आहे. शिवाय 10 हजार 355 कोटी रुपये उपकरांचा समावेश आहे.

गत आर्थिक वर्षात चौथ्यांदा एकूण मासिक जीएसटी संकलन १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. गत आर्थिक वर्षाची सांगता मागच्या शुक्रवारीच झाली होती. सरत्या आर्थिक वर्षात एकूण जीएसटी संकलन २२ टक्क्यांनी वाढून १८.१० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सरासरी मासिक संकलनाचा विचार केला तर हा आकडा १.५१ लाख कोटी रुपये इतका आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button