Stomach Bloating : पोट फुगल्यासारखे वाटते? हे उपाय करून पाहा | पुढारी

Stomach Bloating : पोट फुगल्यासारखे वाटते? हे उपाय करून पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपले पोट जरा देखील फुगले की, आपलं कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. कधी कधी पोटात हवा असल्यासारखं वाटतं. तर कधी पोट गच्च वाटतं. काही तरी खाल्ल्यानंतरदेखील (Stomach Bloating) आपले पोट फुगते. कधी कधी आपण सकाळी नाश्ता केल्यानंतर थेट आपण दुपारीच जेवतो. पण, दुपारी जेवल्यानंतर काही वेळाने आपले पोट खूपचं फुगल्यासारखे वाटते. काही जणांना पोटात दुखूही लागते. सकाळी नाश्ता केल्यापासून दुपारपर्यंतचा जो कालावधी आहे, त्या वेळेत काही किरकोळ खावे, शेंगदाणे, फुटाणे, फळे असेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता. खूप वेळ पोट रिकामं ठेवू नये, असे म्हटले जाते. (Stomach Bloating)

खूप वेळ उपाशी राहू नये, असे म्हटले जाते. कधी कधी आपल्याकडून एकाचवेळी खूप सारे पदार्थ खाल्ले जातात. पण, तसे न करता थोड्या-थोड्या अंतराने खावे. खूप वेळ उपाशी राहू नये. नाही तर गॅसची समस्या जाणवू लागते. ॲसिडीटी होऊनही जळजळ, मळमळ आणि अस्वस्थपणा जाणवतो. आपण पाणी न पिल्यामुळेही किंवा जड पदार्थ खाल्ल्यानंतर ते न पचल्यामुळेही ही समस्या उद्भवते. यावर काही घरगुती उपाय करून या समस्येतून तुम्ही मुक्त होऊ शकता.

ओव्याचे पाणी

चिमुटभर ओव्यानेही पोट साफ व्हायला मदत होते. पोट जड झाल्यासारखं वाटल्यास पटकन चिमुटभर ओवा चावून खावा आणि त्यावर गरम पाणी प्यावे. पचनसंस्थेसाठीही ओवा खूप गुणकारी आहे. ओव्याचे पाणीही तुम्ही पिऊ शकता. यासाठी रात्री एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा ओवा भिजत घालावा. सकाळी उठून हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे. दिवसभर तुम्हाला पोट फुगणार नाही, पोट साफ तर होईलचं शिवाय पोटात सूजही येत नाही.

lemon
lemon

खाण्याचा सोडा-लिंबू

अन्नपचन झाले नाही की, तरीही पोट फुगते. अशा वेळी अर्धा लिंबू कापून घ्यावा. त्यावर चिमुटभर खाण्याचा सोडा टाकावा. सोडा टाकल्यानंतर लिंबूपटकन तोंडात टाकावा. त्याचा रस प्यावा. दुसरे म्हणजे एका वाटीत अर्धा लिंबू पिळावा. त्यामध्ये चिमुटभर टाकावा आणि हे पाणी पटकन प्यावे. यामुळे पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होईल.

पुदिना

घरी पुदिना असेल तर त्या पानांपासून मस्त पुदिना सरबत बनवा. पुदिनामुळे पोट थंड राहत. छातीत होणारी जळजळही कमी होते. मसालेदार, तेलकट पदार्थांच्या पचनासाठी पुदिना खूप फायदेशीर आहे. पुदिनाची चार-पाच पाने चावून खाल्ली तरी आराम मिळतो.

बडीशेप

बडीशेप आरोग्यासाठी खूपचं फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी बडिशेपच्या पाण्याचा वापर केला जातो. अनेकजणांना जेवल्यानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. जेवणानंतर पचनक्रियासाठी बडीशेप खूपच फायदेशीर आहे.

पेरू

सकाळी रिकाम्या पोटी पेरू खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पेरूमुळे पोट साफ होते.

Back to top button