पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वांनीच शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जातीय सलोखा ठेवूनचं तोडगा काढावा लागेल, असे नमूद केले. अजित पवार यांनी कुणावरही राजकीय आरोप अथवा टीका केली नाही.
अजित पवार म्हणाले-दंगल घडवणाऱ्यांना कुणीही खतपाणी घालू नये. लोकांच्या भावना भडकावयचा प्रयत्न केला तर कुणीही खतपाणी घालू नका. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. आपल्या महापुरुषांची शिकवण लक्षात ठेवा. वातावरण बिघडेल असं कोणतेही वक्तव्य मी करणार नाही. छत्रपती संभाजीनगर हिंसाचारावर चुकीचं वक्तव्य करणार नाही. विरोधक असलो तरी प्रक्षोभक बोलणार नाही.
अजित पवार पुढे म्हणाले-महाविकास आघाडीच्या सभेची तयारी व्यवस्थित सुरू आहे. कुणी भडकवण्याचा प्रयत्न केला तर बळी पडू नका. २ एप्रिलची सभा आधीच ठरली होती . सभेसाठी अंबादास दानवे यांनी खूप मेहनत घेतली. संभाजीनगरमध्ये २ तारखेला मविआची सभा असेल. ठरलेले कार्यक्रम वेळेत व्हावेत, ही इच्छा.
यावेळी सर्वांनीच शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले.