सावधान…१५२ दिवसांमध्‍ये कोरोना रुग्‍णसंख्‍येत सर्वाधिक वाढ, २,१५१ नवे रुग्‍ण | पुढारी

सावधान...१५२ दिवसांमध्‍ये कोरोना रुग्‍णसंख्‍येत सर्वाधिक वाढ, २,१५१ नवे रुग्‍ण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात पुन्‍हा एकदा कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने दिलेल्‍या आकडेवारीनुसार, गेल्‍या २४ तासांमध्‍ये २,१५१ नवीन रुग्‍ण आढळले आहेत. देशात आता सक्रीय कोरोना रुग्‍णांची संख्‍या ११ हजार ९०३ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्‍ये वाढलेली रुग्‍णसंख्‍या ही मागील १५२ दिवसांमधील सर्वाधिक आकडेवारी आहे.

देशात २८ ऑक्‍टोबर २०२२ राजी एकाच दिवशी कोरोनाची २ हजार २०८ नवे रुग्‍ण आढळले होते. यानंतर आता २४ तासांमध्‍ये २ हजार १५१ नवे रुग्‍ण आढळले आहेत. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना नुकत्‍याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनापासून बचावासाठी चतुःसूत्री

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘चार टी’ म्हणजेच टेस्ट-ट्रॅक-ट्रिट-टीकाकरण (लसीकरण) करण्याचा सल्ला दिला आहे. मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर राखा, शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी यांचे निरीक्षण करा, या महत्त्वपूर्ण सूचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.

खोकला असल्यास डॉक्टरांकडे जा, ही औषधे वापरु नका

पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हायरल फ्लू झाल्याची शंका असल्यास अँटिबायोटिकचा वापर करू नये. मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ‘लोपीनावीर-रिटोनावीर’, ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’, ‘आयव्हरमेक्टिन’, ‘मोलनुपिरावीर’, ‘फॅव्हिपिरावीर’, ‘अ‍ॅझिथ्रोमायसिन’ आणि ‘डॉक्सीसायक्लीन’ यासारखी औषधे वापरली जाऊ नयेत,असे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला होता. तथापि, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने वेग पकडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आठवड्यांत देशातील कोरोना संसर्गाची संख्या 9 पटीने वाढली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button