NCP MP Mohammad Faizal | राष्ट्रवादीला मोठा दिलासा! मोहम्मद फैजल यांना खासदारकी बहाल, अपात्रेची अधिसूचना लोकसभा सचिवालयाने मागे घेतली | पुढारी

NCP MP Mohammad Faizal | राष्ट्रवादीला मोठा दिलासा! मोहम्मद फैजल यांना खासदारकी बहाल, अपात्रेची अधिसूचना लोकसभा सचिवालयाने मागे घेतली

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; लोकसभा सचिवालयाने बुधवारी लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी. पी. मोहम्मद फैजल (NCP MP Mohammed Faizal) यांना खासदार म्हणून अपात्र ठरवणारी अधिसूचना मागे घेतली. मोहम्मद फैजल यांनी लोकसभा सचिवालयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याच्या काही तास आधी लोकसभा सचिवालयाने फैजल यांना पुन्हा खासदारकी बहाल केली आहे.

लोकसभा सचिवालयाने आज २९ मार्च रोजी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी. पी. यांना लोकसभा सदस्यत्व बहाल करत असल्याची अधिसूचना जारी केली आहे. केरळ उच्च न्यायालयाने फौजदारी खटल्यातील शिक्षेवर दिलेल्या स्थगितीच्या आदेशाच्या आधारे लोकसभा सचिवालयाने त्यांना पुन्हा खासदारकी बहाल केली आहे.

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्षद्वीप येथील कावारत्ती न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पी. पी. मोहम्मद फैजल यांना लोकसभा सदस्य पदावरून अपात्र ठरवण्यात आले होते. लोकसभा सचिवालयाने १३ जानेवारी रोजी उशिरा रात्री मोहम्मद फैजल यांना लोकसभा सदस्यपदावरून अपात्र ठरविल्याची अधिसूचना जारी केली होती. लक्षद्वीपचे खासदार फैजल यांना कावारत्ती सत्र न्यायालयाने ११ जानेवारी रोजी १० वर्षाची शिक्षा सुनावली होती. फैजल २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर लक्षद्वीप येथून निवडून आले होते. मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार आहे. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

काय आहे प्रकरण?

लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना लक्षद्वीपमधील कावारत्ती सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई पदनाथ सालीह यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने याप्रकरणी एकूण ४ जणांना दोषी ठरवले असून फैजल यांच्यासह सर्व दोषींना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. खासदार फैजल यांच्यावर २००९ मध्ये पदनाथ सालिह यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वकिलांच्या म्हणण्यानुसार, खासदार फैजल आणि इतरांनी माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई पदनाथ सालीह यांच्यावर हल्ला केला, जेव्हा ते २००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एका राजकीय प्रश्नी हस्तक्षेप करण्यासाठी गेले होते.

फैजल यांनी आपल्या विरोधात राजकारण करून आपल्याला फसवण्यात आल्याचे सांगत उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचे सांगितले आहे. फैजल यांच्यावर या व्यतिरिक्त २०१२ मध्ये सीबीआयने कथित टुना मासळी श्रीलंकेच्या एका कंपनीला निर्यात केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.

 हे ही वाचा :

Back to top button