पुणे शहरातील ई-रिक्षांना 25 हजारांचे अनुदान; स्थायी समितीची मंजुरी | पुढारी

पुणे शहरातील ई-रिक्षांना 25 हजारांचे अनुदान; स्थायी समितीची मंजुरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नव्याने ई-रिक्षा घेणार्‍या रिक्षामालकांना महापालिका आता 25 हजारांचे अनुदान देणार असून, यासंबंधीच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाच हजार रिक्षांना या अनुदानाचा लाभ मिळणार असून डीबीटी पद्धतीने थेट रिक्षाच्या परमीटधारकांच्या खात्यात ते जमा केले जाणार आहे. शहरात पर्यावरण संवर्धन तसेच वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून ई-वाहनांना चालना दिली जात आहे.

त्यानुसार महापालिकेस 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मिळालेल्या निधीतून ई-रिक्षासाठी अनुदान योजनेचा खर्च केला जाणार आहे. यापूर्वी सीएनजी रिक्षांना 12 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. मात्र, 2018 मध्ये शहरात जवळपास सर्व रिक्षा सीएनजी झाल्या. तसेच नवीन रिक्षा सीएनजीच्याच असण्याचे धोरण शासनाने आणले आहे. दरम्यान या अनुदानाचा रिक्षामालकांना फायदा होणार आहे. मात्र, हे अनुदान केवळ नवीन रिक्षांसाठी असणार आहे.

अशी असेल अनुदानाची प्रक्रिया
ई-रिक्षासाठी अनुदान देण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. फक्त प्रवासी रिक्षांना हे अनुदान मिळणार आहे. शहरात 1 जानेवारी 2022 पासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या पहिल्या 5 हजार रिक्षांना हे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी या रिक्षा थ्री व्हीलर पॅसेंजर 3 वॅट या प्रकारातील असणे बंधनकारक असणार आहे. अशा रिक्षामालकांचे अर्ज महापालिका ऑनलाइन मागवून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना अनुदान दिले जाणार आहे.

Back to top button