पुणे : डोंगर उतारावरील पाण्यासाठी महापालिकेची उपाययोजना | पुढारी

पुणे : डोंगर उतारावरील पाण्यासाठी महापालिकेची उपाययोजना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डोंगरावरून येणार्‍या पावसाच्या पाण्यामुळे मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शहरात जागोजागी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिकेने डोंगर उतारावरून येणार्‍या पाण्यासाठी उपाय योजना करण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून डोंगराच्या पायथ्याला उमग पावणार्‍या ओढ्यांचे व नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून त्याची वहन क्षमता वाढविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

लहान-मोठ्या पावसामध्ये शहरातील रस्त्यांवर पाणी साचण्याचे व ओढ्यांना पूर येण्याचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे रस्ते असल्याने पावसाचे पाणी जमिनीत जिरत नाही, हे त्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. मात्र, शहराच्या पश्चिम व दक्षिण बाजूला मोठ्या प्रमाणात डोंगर आहेत. त्यातच शहरातील वाहणार्‍या ओढ्यांवर आणि नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने, अनेक ठिकाणी ओढे व नाले बुजविल्याने, त्याची रुंदी कमी केल्याने लहान लहान पावसामुळेही रस्त्यांवर पाणी साचते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्त्यांवर पाणी साचू नये, नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये, यासाठी उपाय योजना करण्याचे नियोजन केले आहे.

यासंदर्भात विक्रम कुमार म्हणाले, ’शहराला आसपास अनेक डोंगररांगा आहेत. डोंगरावरून येणार्‍या पावसाच्या पाण्यामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पाण्याला योग्य वाट काढून देण्यासाठी डोंगराच्या पायथ्याला उगम पावणार्‍या ओढे आणि नाल्यांची वहनक्षमता वाढविण्यात येणार आहे. यासाठी ओढे आणि नाल्यांवरील अतिक्रमणे काढून त्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे.’

Back to top button