चाकणला कांद्याची आवक वाढली | पुढारी

चाकणला कांद्याची आवक वाढली

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी (दि. 15) कांद्याची भरपूर आवक झाली. अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांनी काढणी केलेला कांदा तातडीने मार्केटमध्ये आणल्याने कांद्याच्या आवकेत उच्चांकी वाढ झाली. आवक वाढल्याने कांद्याच्या दरात मात्र आणखी घसरण झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. खेड बाजार समिती प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चाकणमध्ये 24 हजार 500 पिशवी कांद्याची आवक होऊन कांद्याला 800 ते 1301 रुपये एवढा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या मते कांद्याला अवघा 8 ते 11 रुपये एवढाच प्रतिकिलोला भाव मिळाला आहे. बरेचसे शेतकरी अक्षरशः छातीवर दगड ठेवून अल्पदरात कांदा विक्री करीत असल्याचे चित्र मार्केटमध्ये पाहावयास मिळत आहे.

ऑक्शन हॉलची मागणी
चाकण मार्केटमध्ये बुधवारी विक्रीसाठी आणलेला कांदा ढगाळ हवामान असल्याने प्लास्टिकखाली झाकून ठेवण्यात आला होता. कांद्याचे लिलाव होण्यापूर्वीच अवकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून सायंकाळपर्यंत पाऊस आला नाही. मार्केटमध्ये कांदा ठेवण्यासाठी ऑक्शन हॉल उपलब्ध नसल्याने नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

Back to top button