Delhi Excise Policy Case : दिल्ली अबकारी घोटाळा- अरुण पिल्लईला १३ मार्चपर्यंत ईडी कोठडी | पुढारी

Delhi Excise Policy Case : दिल्ली अबकारी घोटाळा- अरुण पिल्लईला १३ मार्चपर्यंत ईडी कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अरुण पिल्लई नावाच्या हैदराबादस्थित व्यापाऱ्यास सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी अटक केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांच्यातर्फे अरुण पिल्लई काम करीत असल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे. दरम्यान, पिल्लई याला १३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने ज्या लोकांविरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे, त्यात के. कविता यांचाही समावेश आहे. इंडो स्पिरीटस नावाच्या मद्य कंपनीत 65 टक्क्यांची हिस्सेदारी असलेल्या कविता यांची गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ईडीने हैदराबादमध्ये चौकशी केली होती. अरुण पिल्लेचा साथीदार अभिषेक बोईपल्ली याला सीबीआयने ऑक्टोबर 2022 मध्ये अटक केली होती. अभिषेक हा रॉबिन डिस्ट्रीब्युशन एलएलपी नावाच्या कंपनीचा संचालक आहे. रॉबिन डिस्ट्रीब्युशन ही शेल कंपनी असून मद्य धोरण घोटाळ्यातील कमिशनचा पैसा या कंपनीच्या नावावर येत होता, असे सीबीआयचे म्हणणे आहे.

दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयने यापूर्वी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. सात दिवसांच्या सीबीआय कोठडीनंतर त्यांची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोमवारी सीबीआय कोठडी संपल्यानंतर सिसोदिया यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर सिसोदिया यांना पोलिस संरक्षणात तिहार तुरुंगात नेण्यात आले. त्यांना गीता, डायरी आणि पेन ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे औषधे ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने व्यापारी आणि ब्रिंडको सेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक अमनदीप ढल यांनाही अटक केली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात त्याला अटक करण्यात आली होती.

हेही वाचा : 

Back to top button