डीमॅट खात्यांची संख्या दहा कोटींवर | पुढारी

डीमॅट खात्यांची संख्या दहा कोटींवर

टाटा समूहाकडे एअर इंडियाची मालकी आल्यानंतर तिला जगातील आघाडीची आंतरराष्ट्रीय विमान कंपनी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून टाटा समूहाची ‘विस्तार’ ही विमान कंपनी एअर इंडियात सामावून घेतली जाणार आहे. या एकत्रिकरणानंतर ‘एअर इंडिया’ हे एकच नाव अस्तित्वात राहील. एकत्रीकरणामागे एक पूर्ण सेवा देणारी विमान कंपनी असावी व दुसरे म्हणजे परवडणार्‍या दरात सेवा देणारी विमान कंपनी असावी असे द़ृश्य या बदलानंतर दिसेल.

गेल्या 19 महिन्यांत 1 लाखाहून अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करून ‘अ‍ॅपल’ ने देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात अव्वल स्थान मिळवले आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ अर्थात ‘पीएलआय’ योजनेत अ‍ॅपलतर्फे देशात ‘आयफोन’चे उत्पादन करण्यात येत आहे. देशात ‘फॉक्सकॉन’, ‘पेगाट्रॉन’ व बिस्ट्रॉन या कंपन्यांमार्फत आयफोनची निर्मिती करण्यात येते. पूर्वी हे उत्पादन चीनमधून घेतले जायचे. आता या उत्पादनासाठी कंपनीने भारताला प्राधान्य दिले आहे. 1 लाख रोजगारांपैकी 60 टक्के रोजगार या तीन कंपन्यांनी निर्माण केले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 संपण्यासाठी महिन्याचा कालावधी उरला असून उरलेल्या कालावधीत आणखी रोजगार निर्मिती होईल. उरलेल्या 40 हजार रोजगारांची निर्मिती ‘टाटा इलेक्ट्रॉनिक्स’ ‘फॉक्सलिंक’ आणि ‘जेबीएल’ (जग्वार लॅड रोव्हर) यांनी केली आहे. या कंपन्यांमध्ये ‘आयफोन’च्या सुट्या भागांची आणि चार्जरची निर्मिती केली जाते.

देशांतर्गत अर्थिक उलाढाल वाढल्यामुळे वस्तु आणि सेवा कराच्या‘जीएसटी’ संकलनामध्ये फेब्रुवारी महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारीत यंदा सरकारी तिजोरीत जीएसटीच्या माध्यमातून 1.49 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. सहा वर्षांपूर्वी वस्तू सेवा कर कायदा अस्तित्वात आला. तेव्हापासून हे दुसरे सर्वाधिक संकलन आहे. फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस असतात. त्यामुळे सहाजिकच या महिन्यात वस्तू सेवाकराचे उत्पन्न कमी असण्याची शक्यता असते. मात्र, यंदा हा पायंडा मोडला गेला आहे. जानेवारी 23 च्या तुलनेत फेब्रुवारी 23 चे जीएसटीचे संकलन काहीसे कमी असले, तरी हे संकलन सलग 12 महिने 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे.

‘मुडीज’ही एक आंतरराष्ट्रीय पतमूल्यांकन संस्था आहे. तिचे अंदाज बहुतांश बरोबर येत असल्याने तिच्या पतमूल्याला जगात खूप मान्यता आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी वर्तविलेला 4.8 टक्के जीडीपीचा (सकल राष्ट्रीय उत्पन्न) अंदाज सुधारून ‘मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने आता 5.5 टक्के केला आहे. आगामी आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवली खर्चात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्यानुसार ‘मुडीज’ने जीडीपी वाढेल असे म्हटले आहे. प्रथम चालू आर्थिक वर्षासाठी ‘मुडीज’ने जीडीपीचा अंदाज 7 टक्के वर्तवला होता. तो 6.8 टक्के केला आहे.

जागतिक स्तरावर 2023-24 या आर्थिक वर्षाची स्थिती कशी असेल, या विषयीचा अहवाल ‘मुडीज’ने प्रसिद्ध केला आहे. त्यात जी-20 गटातील अनेक देशांच्या आर्थिक स्थितीबाबतचे अंदाज ‘मुडीज’ने बदलले आहेत. त्यात अमेरिका, कॅनडा, भारत, रशिया, मॉक्सिको आणि टर्की यांचा समावेश आहे. हल्ली शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी लहान-मोठे सर्वचजण उत्सुक असतात. देशातील डीमॅट खात्यांची संख्या दहा कोटींवर गेली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत राहील. खर्चातून बचत करून गुंतवणुकीद्वारे मोठा परतावा मिळवण्याचा मोह सर्वांनाच असून त्यात देवस्थानेही मागे राहिली नाहीत. तिरुपती, शिर्डी ही त्यातील प्रमुख उदाहरणे आहेत. या गुंतवणुकीची सुरुवात तिरुपतीच्या बालाजी देवस्थानाने केली. मुंबईच्या सिद्धिविनायकाचेही डीमॅट खाते आहे.

राज्यातील व्यापार्‍याला उत्तेजन व चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर ’ राज्य सरकारचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो’ला 1 लाखाहून अधिक नागरिकांनी भेट दिली. या ‘एक्स्पो’मध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे आयोजकांनी सांगितले. नागरिकांशी संवाद साधणे आणि विक्री करणे हे व्यापार प्रदर्शनाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. रिटेल क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्यासाठीही या प्रदर्शनाचा उपयोग झाला. त्यामुळे या प्रदर्शनाच्या माध्यमाने व्यापार वृद्धीसाठी एक उत्तम व्यासपीठच मिळाले. यामुळे देशभरातील उद्योजक व व्यापार्‍यांना ‘मायटेक्स’ ह्या प्रदर्शनाने एक बाजारपेठ उपलब्ध करून दिली.

डॉ. वसंत पटवर्धन

Back to top button