त्रिपुराच्‍या मुख्‍यमंत्रीपदी पुन्‍हा माणिक साहा, भाजपच्‍या बैठकीत निर्णय

माणिक साहा ( संग्रहित छायाचित्र )
माणिक साहा ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत घवघवती यश मिळवलेल्‍या भाजप आघाडीने पुन्‍हा एकदा माणिक साहा ( Manik Saha ) यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित केले आहे. त्‍यांच्‍याच नेतृत्‍वाखाली भाजपने विधानसभा निवडणूक लढवली होती. माणिक साहा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. साहा दुसऱ्यांदा मुख्‍यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. दरम्‍यान सोमवारी संध्याकाळी त्रिपुरा भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यामध्ये माणिक साहा यांच्या नावावर एकमत होऊन त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

Manik Saha ८ मार्च रोजी घेणार शपथ

माणिक साहा ८ मार्च रोजी मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेण्‍याची शक्‍यता आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहणार आहेत.

गेल्या वर्षी मे महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहा यांना मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्‍वीकारली होती. त्‍यांनी 15 मे 2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

काँग्रेसला सोडचिठ्‍ठी देत भाजपमध्ये केला होता प्रवेश

माणिक साहा यांनी २०१६ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०२० मध्ये त्रिपुरा भाजपचे प्रदेशाध्‍यक्षपदी नियुक्‍ती झाली होती. माणिक साहा हे मुख्यमंत्री होण्याच्या एक महिना आधी राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बिप्लब देब राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले.

नुकत्‍याच झालेल्‍या त्रिपुरा विधानसभा निवडणूक भाजपने आयपीएफटी पक्षासोबत युती करून निवडणूक लढवली होती. तर काँग्रेसने डाव्यांशी युती केली होती. निवडणुकीच्या निकालात भाजपने राज्यात आपली सत्ता कायम ठेवली. भाजपला ३२ आणि आयटीएफटीआयसीला एका जागेवर यश मिळाले. काँग्रेस आणि डाव्या आघाडीला मोठा धक्का बसला. काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर डाव्यांना ११ जागा मिळाल्या. राज्यातील १३ मतदारसंघात टिपरा मोथा पक्षाचे उमेदवार निवडून आले. हा पक्ष प्रथम विधानसभा निवडणूक लढवत होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news