खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल | पुढारी

खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरून बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) नेते खा. संजय राऊत यांच्याविरुद्ध औरंगाबादमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यानंतर १९ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. पत्रकार परिषदेतच त्यांनी अचानक त्रागा करून मुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी होईल, असे भाष्य केले. या प्रकरणी २० फेब्रुवारीला जंजाळ हे शंभरावर कार्यकर्ते घेऊन जवाहरनगर ठाण्यात गेले. त्यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांची भेट घेतली.

त्यांना या प्रकरणी सविस्तर निवेदन सादर केले. जंजाळ यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, हा अदखलपात्र गुन्ह्याचा प्रकार असल्याचे सांगून ड्यूटी अधिकारी उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी एनसी दाखल केली. उपनिरीक्षक रमेश राठोड अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button