उस्मानाबाद : ‘ई संजीवनी’ ओपीडी फायद्याची; तज्ञ डॉक्टर देतात मोफत सल्ला | पुढारी

उस्मानाबाद : 'ई संजीवनी' ओपीडी फायद्याची; तज्ञ डॉक्टर देतात मोफत सल्ला

उमरगा: पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेली कन्सल्टेशन सेवेद्वारे ऑनलाइन ई संजीवनी ओपीडी सेवा फायदेशीर ठरत आहे. ई संजीवनी या ओपीडी सेवेचा आता पर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 963 रुग्णांला याचा फायदा झाला आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना महामारीच्या काळात सुरवात केलेली पहिली ऑनलाईन ई संजीवनी ओपीडी सेवा आहे. घराबाहेर न पडता घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून देशातील प्रसिद्ध व कोणत्याही तज्ञ डॉक्टराचा आरोग्य विषयक मोफत सल्ला घेता येतो. त्यामुळे देशात ही सेवा दिवसेंदिवस वेगाने लोकप्रिय होत आहेत. देशातील आतापर्यंत 96 लाख 75 हजार 328 नागरिकांना याचा फायदा झाला आहे.

देशात ई संजीवनी या सेवेचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्या राज्याच्या यादीत महाराष्ट्र हे सातव्या क्रमांकाचे राज्य आहे. आतापर्यंत राज्यभरात 1 लाख 96 हजार 563 तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 1 हजार 963 जणांनी यासेवेचा फायदा घेतला आहे. ही सेवा मोबाईल अ‍ॅपवर झाल्याने त्याचा सामान्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सकाळी 9 ते सायंकाळी पाच या काळात उपलब्ध असून त्यासाठी रुग्णाकडून कसल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

नॅशनल टेली कन्सल्टेशन सर्विसद्वारे रुग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा मार्गदर्शन रुग्णालयात न जाता घरच्या घरी मिळावा. त्यासाठी ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. वयोवृध्द रुग्ण व ग्रामीण भागात राहणार्‍या अनेक नागरिकांना रुग्णालयात पोहचणे अवघड जाते, अशावेळी त्यांना घरी बसूनच वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी. या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे तज्ञ डॉक्टरांनी उपचारांचा सल्ला दिल्यानंतर अ‍ॅपमध्ये किंवा संकेत स्थळावर त्वरित औषधीचे प्रिस्क्रीप्शन उपलब्ध होईल. या प्रिस्क्रीप्शनची प्रिंट काढून खासगी मेडिकल किंवा शासकीय रुग्णालयातील औषधी विभागामधून औषधी घेता येणार आहेत.

दररोज पहिल्या सत्रात सकाळी 9 वाजे पासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत ऑनलाईन सुरू राहणार आहे. दुसर्‍या सत्रात दुपारी 1:45 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन सुरू राहणार आहे. तसेच घरबसल्या डॉक्टरांकडून मोफत सल्ला घेण्यासाठी सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून एक उत्तम पर्याय दिला आहे. ई संजीवनी आयुष ओपीडीची देखील सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे या ओपीडीत होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी आदि पॅथीच्या रुग्णांना तज्ञांचा सल्लाही मिळणार आहे. जिल्ह्यात ही सुविधा सर्व रुग्णांकरिता मोफत आहे. थेट तज्ञाचा सल्ला ई- संजीवनी मुळे घरबसल्या मिळत आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

रुग्णांना मोफत सल्ला किंवा मार्गदर्शन देण्यासाठी भारतात 32 हजार 67, तर राज्यातून 3 हजार 496 डॉक्टर्स रजिस्टर करण्यात आले आहेत. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील 76 तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये ई संजीवनी अ‍ॅप डाऊनलोड करून घरबसल्या या सेवेचा लाभ घ्यावा.
– डॉ. राज गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक, उस्मानाबाद

हेही वाचलंत का ? 

Back to top button