Strawberry : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला उस्मानाबादमध्ये बहर | पुढारी

Strawberry : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला उस्मानाबादमध्ये बहर

उस्मानाबाद : भीमाशंकर वाघमारे : केवळ पावसाच्या पाण्याचाच आधार… पाऊसही अगदी कमी प्रमाणात… त्यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळी शिक्‍का बसलेल्या उस्‍मानाबाद जिल्ह्यात आता आधुनिक शेतीची बिजे रुजू लागली आहेत. त्यामुळेच शेतशिवारात नवनवीन प्रयोगही मूळ धरु लागले आहेत. त्यातूनच जर्बेराच्या फुलशेतीनंतर स्ट्रॉबेरीचे (Strawberry) मळेही फुलू लागले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान जेमतेम 650 मिलीमीटर इतकेच. त्यामुळे आहे, त्या पाण्यावरच शेती करणे क्रमप्राप्‍त. जिल्ह्यात बारमाही वाहणारी एकही मोठी नदी किंवा धरण नाही. त्यामुळे पारंपरिक पिकांशिवाय गत्यंतर नाही. मागील काही वर्षांपासून मात्र उच्चशिक्षित शेतकर्‍यांची संख्या वाढू लागली आहे. शेतकर्‍यांकडून आधुनिक शेतीचा मंत्र स्वीकारण्याची मानसिकता वाढत गेली. त्यामुळेच कमी पाण्यावरील शेतीचे प्रयोग होऊ (Strawberry) लागले आहेत.

काही वर्षांपूर्वी जर्बेरा फुलशेतीचे प्रयोग यशस्वी झाले. फळबागा वाढल्या. शेतकर्‍यांचे जीवनमान पर्यायाने जिल्ह्याचे अर्थकारण बदलू लागले. त्याचा चांगला परिणाम समाजमनावरही होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, थंड वातावरणात उगवणारे विदेशी फळ म्हणून स्ट्रॉबेरीची ओळख आहे. उस्मानाबाद हे मराठवाड्यात सर्वात उंचीवर असलेल्या स्थळांत दुसर्‍या क्रमांकाचे स्थान आहे. त्यामुळे येथे थंडी मोठ्या प्रमाणात असतो. याचाच विचार करुन दोन वर्षांपूर्वी तुळजापूर तालुक्यातील एका शेतकर्‍याने याचा प्रयोग केला. तो यशस्वी झाल्याने यंदा ५ एकरावर ५ शेतकर्‍यांनी स्ट्रॉबेरी फुलविली आहे. येथील हवामान, वातावरण स्ट्रॉबेरीला पोषक असल्याचेही आता या प्रयोगांतून सिध्द होऊ लागले आहे.

Strawberry: स्ट्रॉबेरीतून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न

स्ट्रॉबेरीतून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. सध्या स्ट्रॉबेरीला प्रति किलो साडेचारशे रुपये असा भाव आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीची शेती शेतकऱ्यांना मालामाल करत आहे. कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील शिवाजी साखरे व प्रदीप साखरे या पिता-पुत्रांनी एक एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची शेती केली. यामधून त्यांना दोन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळविले आहे.

तुळजापूर तालुक्यातील सचिन सूर्यवंशी व वैभव सूर्यवंशी या दोघांनी देखील स्ट्रॉबेरीची शेती करून मोठा फायदा मिळविला आहे. कोरडवाहू समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये सध्या स्ट्रॉबेरीची शेती फायद्यात येताना दिसू लागली आहे. पर्वतीय व थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. तिथल्या पोषक वातावरणामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पन्नही शेतकऱ्यांना चांगले मिळते. गेल्या आपल्या दोन-तीन वर्षात चांगला पाऊस झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीकडे वळताना दिसू लागला आहे.

हेही वाचा : 

Back to top button