महिला दररोज विनापगार किती तास घरगुती काम करतात? : जाणून घ्‍या नवीन सर्वेक्षणातील माहिती | पुढारी

महिला दररोज विनापगार किती तास घरगुती काम करतात? : जाणून घ्‍या नवीन सर्वेक्षणातील माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ” आम्‍हीच घरात राबराब राबायचे. घरगुती कामाच्‍या सर्व अपेक्षा आमच्‍याकडूनच. आमचा जन्‍मच रांधा, वाढा, उष्‍टी काढा… यासाठी झाला आहे का?,” असे घरगुती कामाला वैतागलेल्‍या तुमच्‍या घरातील आई, बहिण, वहिनी किंवा पत्‍नीने केलेला सवाल तुम्‍ही कधीतरी तुम्‍ही ऐकला असेलच. त्‍याचा हा सवालही योग्‍यच आहे. कारण आजही आपल्‍याकडे घरगुती कामात पुरुषांच्‍या तुलनेत सर्वाधिक श्रम या महिलाच करतात. हे पुन्‍हा एकदा अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्‍या प्राध्‍यापकांनी सर्वेक्षणाच्‍या आधारीत केलेल्‍या संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. जाणून घेवूया नवीन संशोधनात घरगुती कामात ( Domestic work ) महिला विनापगारी किती योगदान देतात याविषयी…

घरगुती काम महिलाच करतात हे सर्वांना माहित आहेच; मग नवीन संशोधन कशासाठी असा प्रश्‍नही तुमच्‍या मनात आला असेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्‍या प्राध्‍यापकांनी आपल्‍या ‘टाइम यूज डेटा: ए टूल फॉर जेंडर्ड पॉलिसी ॲनालिसिस’ या शोधनिबंधात महिला किती तास घरगुती कामावर खर्च करतात आणि तेही विनामूल्‍य यावर संशोधन करण्‍यात आले. यातून समोर आलेली माहिती ही घरगुती कामाचा आळस करणारे किंवा घरगुती काम हा महिलांचाच कार्यभार आहे अशी मानसिकता असणार्‍या पुरुषांच्‍या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे.

या संशोधनाबद्दल अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्‍या ( आयआयएमए) प्राध्‍यापिका नम्रात चिंदरकर यांनी वृत्तसंस्‍था ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले की, घरगुती कामात महिला आणि पुरुषांमधील वेळेचे वाटप समजून
घेण्‍यासाठी हे संशोधन महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. तसेच वर्षानुवर्ष घरगुती कामातील लिंग असमानता तपासण्‍यासाठीही या संशोधनाचे महत्त्‍व आहे.

सर्वेक्षणात असे आढळले की, देशभरात मजुरी करुन आपलं उपजिविका चालविणार्‍या महिला घरगुती कामात मजुरी करणार्‍या पुरुषांच्‍या तुलनेत दुप्‍पट वेळ देतात. त्‍यामुळे कष्‍टकरी महिलांना पुरुषांच्‍या तुलनेत फुरसतीचा वेळ २४ टक्‍क्‍यांपेक्षा कमी मिळतो. महिलांचा मोठा वेळ त्यांच्या रोजगाराच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जातो, असेही आमच्‍या निदर्शनास आल्‍याचे चिंदरकर यांनी सांगितले.

 Domestic work : महिला विनापगारी दररोज ७.२ तास घरगुती काम करतात

प्राध्‍यापकांनी सर्वेक्षणात १५ ते ६० वयोगटातील महिलांना प्रश्‍न विचारले. त्‍यांना असे आढळले की, महिला घरगुती कामासाठी दररोज विनापगारी किमान ७.२ तास घालवतात तर पुरुष केवळ २.८ तास एवढाच वेळ घरगुती कामासाठी देतो. विशेष म्‍हणजे, ज्‍या महिला रोजंदारीवर काम करतात त्‍यांनाच घरातील साफसफाईपासून जेवण करण्‍यापर्यंतची सर्व कामे
स्‍वत:च करावी लागतात. नोकरी करुन वेतन मिळवणार्‍या पुरुषांच्‍या तुलनेत बिनपगारी घरगुती कामासाठी महिला दुप्‍पट वेळ देतात.

पारंपारिक इंधन वापरणाऱ्यांच्या तुलनेत एलपीजी किंवा इतर स्वच्छ स्वयंपाक इंधन वापरणाऱ्या घरातील महिलांना ४१ ते ८० मिनिटांचा वेळेची बचत होते, असेही निरीक्षण या संशोधनात नोंदविण्‍यात आले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button