गुलाब चक्रीवादळ! नंदुरबारमध्ये हजारो हेक्‍टरवर पिकांची नासाडी | पुढारी

गुलाब चक्रीवादळ! नंदुरबारमध्ये हजारो हेक्‍टरवर पिकांची नासाडी

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार जिल्ह्यातही गुलाब चक्री वादळाचा जबर फटका बसला. सलग मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे वीज पडणे, शेतजमीन वाहून जाणे, घरे कोसळणे, पुलाचा भराव वाहणे अशा अनेक प्रकारची हानी झाली. या सर्व नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरु करण्यात आले असून, प्राथमिक अंदाजानुसार जिल्हाभरात सुमारे दीडशे गावांमधील २ हजारांहून अधिक शेतकर्‍यांच्या शेतातील पिकाची हानी झाली. तर जवळपास १०० घरांची पडझड झाली आहे.

गुलाब चक्री वादळामुळे झालेल्‍या वादळी पावसामुळे वडगावात वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाला. दुरबार शहरात टेकडीवरील भलामोठा दगड घरावर कोसळण्याची दुर्घटना घडली.

उत्तर मध्य महाराष्ट्रात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर मध्य महाराष्ट्रात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असतानाच जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर आणि शहादा या तालुक्यात प्रामुख्याने नुकसान झाले आहे. सलग झालेल्या मुसळधार पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले.

नंदुरबार तालुक्यातील ६५ गावांतील सुमारे अडीच शेतकर्‍यांना फटका बसून त्यांच्या जवळपास १४०० हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिकाची नासाडी झाली आहे.

शेतांमध्ये चिखल झाल्‍याचे विदारक दृश्य पाहायला मिळाले. प्रामुख्याने कांदा, पपई आणि कापसाचे पीक उध्वस्त झाले आहे.

दरम्यान, नंदुरबार शहरातील २, शनिमांडळमधील ५, बलवंड, हाटमोहिदे येथे एकेका घराचे तर खोकरे व अन्य गावातही घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे.

सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. नंदुरबार शहरातील वाघेश्‍वरी टेकडीवरील भलामोठा दगड घरांवर कोसळून आल्याची दुर्घटना घडली.

त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अविनाश गवळी यांच्या घराचे मात्र नुकसान झाले. नगरपालिकेने तेथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलविले आहे.

दरम्यान, तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी पथकांना तातडीने पंचनाम्यासाठी कार्यरत करून स्वत: जातीने माहिती घेतली.

पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानीची सविस्तर माहिती देता येईल, असे भाऊसाहेब थोरात म्हणाले.

शहादा येथेही सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली. शहरातील अनेक वसाहती पाण्याने वेढल्या गेल्या होत्या. सारंगखेडा-टाकरखेडा मार्गावर तापीवरील पुलाचा भराव वाहून गेला. यामुळे या पुलाचा धोका वाढला आहे.

याच दरम्यान शहादा तालुक्यातील वडगाव येथे वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाला तर जवळपास ५० हून अधिक घरांची पडझड झाली.

अनेक गावातील शेती पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान

अनेक गावातील शेती पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले असून तहसीलदार मनोज कुलकर्णी यांनी पंचनामे करण्याला वेग दिला आहे. नवापूर तालुक्यात देखील शेतीचे प्रचंड विदारक दृष्य पहायला मिळाले.

तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यात १० गावांमधील १६१ शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांची हानी झाली.

त्याचे पंचनामे सुरु आहेत. जवळपास १० घरांची पडझड झाली असून त्याचेही पंचनामे सुरु आहेत. तळोदा तालुक्यात ३० घरांच्या पडझडीची नोंद झाली.

धरणांचे दरवाजे पूर्णक्षमतेने उघडले

दरम्यान, तापी, गोमाई आणि अन्य नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशातच प्रकाशा, सारंगखेडा सुलवाडे धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे लाखो क्युसेक्स पाण्याची भर पडून पुराच्या पातळीत प्रचंड वाढली आहे.

शासकीय माहितीत म्हटले आहे की, हतनूर आणि वाघूर धरणातून 1 लाख 49 हजार 110 क्युसेक्स व सुलवाडे बॅरेजचे 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात येवून 2 लाख 32 हजार 701 क्युसेक इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे 12 दरवाजे पूर्णपणे उघडून 2 लाख 21 हजार 664 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला आहे.

प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 21 दरवाजे पूर्णपणे उघडून 2 लाख 36 हजार 093 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

पुढील 48 ते 72 तासांत सदर प्रकल्पाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यकतेनुसार विसर्ग वाढविण्यात येईल.

तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नयेत अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये.

नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी केले आहे.

गोमाई काठच्या गावांनाही सतर्कतेचे आवाहन…

लघू पाटबंधारे योजना सुसरी प्रकल्पातून 1 हजार 875 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोमाई नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

यामुळे टेंभली, लोणखेडा, मलोणी, उंटावद, तिखोरा, शहादा, पिंगाणे, धुरखेडा, मनरद, करझई, डामरखेडा व लांबोरा नदीकाठच्या गावातील तसेच आसपासच्या गावांच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये.

असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी केले आहे.

Back to top button