पुणे : शस्त्रधारी पोलिसांचा शहराला पहारा ; अडीचशे कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण | पुढारी

पुणे : शस्त्रधारी पोलिसांचा शहराला पहारा ; अडीचशे कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोयताधारी टोळक्याचा धुडगूस, दहशतीसाठी केली जाणारी वाहनांची तोडफोड, जबरी चोरी, घरफोड्या अशातच विमानतळ परिसरात पोलिसांवर झालेला हल्ला, अशा गुन्हेगारी कृत्याच्या पार्श्वभूमीवर शहरात चोवीस तास आता शस्त्रधारी पोलिस गस्त घालणार आहेत. त्यासाठी अडीचशे पोलिसांना खास प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच, मध्यवस्ती आणि उपनगरातील गल्लीबोळांतील रस्ते पाहता अद्ययावत दुचाकी देखील त्यांच्या दिमतीला देण्यात येणार आहे.

शहरविस्तार होत असताना गुन्हेगारी देखील फोफावते आहे. स्ट्रीट क्राईममध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. रात्रीबरोबरच दिवसाही नागरिकांना चोरट्यांकडून टार्गेट केले जात आहे. अनेकदा कोयत्याच्या धाकाबरोबरच गंभीर दुखापत करून नागरिकांना चोरट्यांकडून लुटले जाते आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी तर पादचार्‍यांना लुटण्याचा सपाटा लावला आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने चोरटे भुर्रकन लंपास करीत आहेत. मोबाईल हिसकाविण्याचे प्रमाण मोठे आहे. दुसरीकडे शहरांतर्गत बसमधून प्रवास करताना तसेच बसस्थानक परिसरात चढता-उतरताना प्रवाशांचा किमती ऐवज चोरटे चोरी करीत आहेत.

गेल्या महिन्यात विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोहगाव परिसरात गस्तीवरील मार्शलवर एकाने कटरने हल्ला केला. त्यांच्या गालावर तेरा ते चौदा टाके पडले. त्यामुळे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरात गस्त घालण्यासाठी शस्त्रधारी पोलिस तैनात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. गस्त घालणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांसाठी नव्याने 125 दुचाकी घेण्यात येणार आहेत. एका दुचाकीवर दोन बीट मार्शल कर्तव्यावर असणार आहेत. त्यासाठी 250 कर्मचार्‍यांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुणे शहर आयुक्तालयातील पाचही परिमंडलांच्या हद्दीत या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. रस्त्यावर पोलिसांचा वाढता वावर असणे, हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

चोरट्यांना पाहून पोलिस पळाले होते…

औंध परिसरात घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांची माहिती मिळाल्यानंतर रात्रगस्तीवरील बीट मार्शल तेथे पोहचले. मात्र, शस्त्रधारी चोरट्यांना पाहून त्यांनी तेथून चक्क पळ काढला होता. हा सर्व प्रकार तेथील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. त्या वेळी पोलिसांकडे एसएलआर (रायफल) होती की नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र, प्रत्यक्षात घटनास्थळावर गेलेले बीट मार्शल रायफल न घेताच तेथे गेले होते. या प्रकारामुळे पोलिसांना देखील टीकेचे धनी व्हावे लागले होते. अलीकडील कालावधीत गुन्हेगारांची मजल वाढली आहे. पोलिसांवर देखील ते हल्ले करू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यातील मोक्काच्या गुन्ह्यातील एका आरोपीने पोलिसांवर हल्ला करून धूम ठोकली.

संवेदनशील ठिकाणी गस्त वाढविणार

पोलिस ठाण्यात गस्तीसाठी असलेली सीआर मोबाईल व्हॅन नव्या तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात येणार आहे. कामाचा ताण असणार्‍या पोलिस ठाण्यात अशा दोन व्हॅन कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. संवेदनशील ठिकाणे, गुन्हेगारीचे हॉटस्पॉट अशा ठिकाणी ही व्हॅन गस्त घालणार आहे. 112 या पोलिस हेल्पलाइनचे नियंत्रण मुंबईहून होते. तेथे कॉल गेल्यानंतर तो कोणत्या शहरातील आहे, हे पाहून तेथे वळविला जातो. मात्र, असेही काही कॉल स्थानिक पोलिस ठाणे, पोलिस आयुक्त कार्यालय, थेट पोलिस अधिकार्‍यांना येतात. त्या सर्व कॉलची येथे तत्काळ दखल घेतली जाणार आहे. जीपीएसद्वारे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात घडलेल्या प्रत्येक घटनेची माहिती सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना एकाचवेळी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच, नियंत्रण कक्षाला कॉल केल्यानंतर मदत मिळण्यासाठी लागणारा कालावधीसुद्धा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

पोलिसांचा प्रेझेन्स रस्त्यावर दिसला तर गुन्हेगारांना त्यांचा धाक निर्माण होतो. पोलिसांवर देखील गुन्हेगारांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालण्यासाठी प्रशिक्षित शस्त्रधारी पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना खास प्रशिक्षण देण्यात येणार असून, अद्ययावत वाहनेसुद्धा पुरवली जाणार आहेत.

                                                – रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

 

Back to top button