पुणे : श्री पांडुरंग-राही रखुमाईला पंचामृताने अभिषेक | पुढारी

पुणे : श्री पांडुरंग-राही रखुमाईला पंचामृताने अभिषेक

कडूस : पुढारी वृत्तसेवा
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती !
रखुमाईच्या पती सोयरिया !!
गोड तुझे रूप गोड तुझे नाम !
देई मज प्रेम सर्वकाळ !!

आकर्षक फुलांची सजावट… सनईचा मंजूळ स्वर… रंगीबेरंगी माळांचा झगमगाट… नयनमनोहारी रांगोळी… अशा मंगलमय वातावरणात ब—ह्मवृदांनी केलेल्या मंत्रघोषात जया एकादशीनिमित्त श्री पांडुरंग-राही रखुमाईला पंचामृताने अभिषेक करण्यात आला.
अभिषेकानंतर हजारो भाविकांनी श्री पांडुरंग-राही रखुमाईचे साजिरे रूप डोळ्यांत साठविले आणि ‘विठ्ठल विठ्ठल’च्या जयघोषाने अवघी प्रतिपंढरी कडूसनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

बुधवारी (दि. 1) सकाळी सनई-चौघड्याचा मंजूळ स्वर आणि पुजारी ब—ह्मवृंदांच्या वेदघोषात अभिषेक करण्यात आला. मूर्तींना पंचामृताने स्नान घालण्यात आले. रुद्राभिषेक घालून तुळशीची माळ, मोगरा, झेंडूच्या फुलांच्या हारमाळा, सोनेरी छत्रचामराने श्री पांडुरंग आणि राही-रखुमाईचे रूप अधिकच खुलून आले. यानंतर दर्शनरांग सुरू झाली.

भाविकांनी शांततेत दर्शन घेतले. मोठी गर्दी असूनही कोणतीही गडबड झाली नाही. दुपारी 1 नंतर रात्रीपर्यंत भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. मंदिरातील प्रवेशद्वारावरील फरशीवर काढलेल्या श्री पांडुरंग-राही रखुमाई, वारकरी यांच्या रांगोळीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. भाविकभक्तही मोठ्या भक्तिभावाने या रांगोळीला फुले वाहत होते. एकादशीनिमित्त श्री पांडुरंग मंदिराच्या मंदिरात स्वरचौघड्याच्या मंजूळ स्वराने मंदिरातील वातावरण मंगलमय झाले होते. गाभार्‍यामध्ये आकर्षक फुलांच्या सजावटीने गाभार्‍याचे सौंदर्य लक्षवेधी होते. नेत्रदीपक रोषणाई भाविकांची मने जिंकून घेत होती. या वर्षी प्रथमच पाईट येथून नवखंडेनाथ पाईट दिंडी सोहळा, वडगाव (ता. खेड) येथील दिंडीतील वारकऱ्यांनी गायलेल्या अभंगांनी परिसर मंत्रमुग्ध केला.

 

Back to top button