लवंगी मिरची : वैचारिक मतभिन्नता | पुढारी

लवंगी मिरची : वैचारिक मतभिन्नता

शेवटपर्यंत राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. त्याने झाडावर लटकत असलेल्या वेताळाला काढून आपल्या पाठीवर लादले आणि तो मौन धारण करून चालू लागला. वेताळाने विक्रमादित्याचे मौन तोडण्यासाठी त्याला एक गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. वेताळ सांगू लागला, हे राजन, तुझ्यासारखाच हट्ट धरणार्‍या एका पक्ष प्रवक्त्याची कहाणी आज मी तुला सांगणार आहे. लक्ष देऊन ऐक. कोणे एकेकाळी एक बलाढ्य पक्ष होता. त्या पक्षातील सर्व सरदार एकत्र राहून कार्य करत होते. पक्ष मोठा होत गेला, तशी पक्षाला प्रवक्त्याची गरज भासू लागली. मग आपल्याचपैकी एका हुशार आणि निष्ठावान माणसाला पक्ष प्रवक्ता म्हणून नेमले गेले तेव्हापासून तो पक्ष प्रवक्ता दररोज नऊ वाजता टीव्हीवर दिसायला लागला. त्याची सुरुवातीची वक्तव्ये ही त्याचा अभ्यास आणि त्याची वैचारिक बैठक याची साक्ष देणारी होती. पुढे पुढे या पक्ष प्रवक्त्याच्या वक्तव्यांमुळे पक्ष कार्यकर्ते अडचणीत यायला लागले.

पक्षामध्ये बेदिली माजायला लागली. पक्ष प्रवक्ता हा राजकारणामध्ये मुरब्बी; परंतु थोडासा चंचल स्वभावाचा होता. त्याचबरोबर त्याची पक्षाच्या नेत्यावर मजबूत पकड होती. नेत्याच्या मुलाखती घेऊन तो त्या नेत्याला लोकप्रिय करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होता; परंतु पुढे पुढे त्याच्या बोलण्यामध्ये भरकटलेपणा दिसायला लागला. त्याची वक्तव्ये हीच प्रमुख नेत्याची वक्तव्ये समजून इतर कार्यकर्ते आणि जनताही त्या पक्षावर नाराज व्हायला लागली.

हळूहळू मोठ्या सरदारांचा एक गट एकत्र झाला आणि बंडखोरी करून त्यांनी प्रमुख राजाचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला. त्यांनी आपला स्वतंत्र सुभा निर्माण करून राज्याच्या नेतृत्वावर हक्क दाखविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हा सहज प्रकार असेल असे वाटले; परंतु बंडखोरी वाढत गेली आणि पक्ष अनेक तुकड्यांमध्ये विखुरला गेला. तसे तर प्रत्येक पक्षामध्ये प्रवक्ते असतातच आणि ते आपापल्या पक्षाला आणि नेत्यांना अडचणीत आणणारी वक्तव्ये नेहमी करत असतात. भारत देशातील एकही पक्ष या प्रवक्त्यांच्या त्रासापासून वाचला नाही. ही गोष्ट सांगून झाल्यावर वेताळ म्हणाला, हे राजन, या गोष्टीतून काही प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न म्हणजे प्रवक्ता हे पद खरोखरच आवश्यक आहे काय? आणि दुसरा प्रश्न म्हणजे या प्रवक्त्यांवर अंकुश कशा प्रकारे ठेवला जाऊ शकतो? हे राजन, तुला या प्रश्नांची उत्तरे माहीत असूनही तू ती दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होतील हे तुला ठाऊक आहेच.

संबंधित बातम्या

यावर विक्रमादित्याने मौन तोडत सांगितले की, या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. कारण प्रत्येक व्यक्तीचे संस्कार, पक्षाची विचारधारा व त्या अनुषंगाने असणारी मनोभूमिका वेगवेगळी असल्याने प्रत्येकास स्वत:चाच विचार व भूमिका योग्य वाटते. तथापि तर्कशास्त्रदृष्ट्या विचार करता या प्रश्नांची उत्तरे खालील प्रकारे असू शकतात. तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे नेता जी भाषा वापरू शकत नाही ती भाषा पक्ष प्रवक्ता सहजरीत्या वापरू शकतो. प्रवक्त्याने काही बोलण्यात गोंधळ केला किंवा गडबड केली किंवा कोणाचा अपमान केला तर पक्षप्रमुख हात वर करून ‘ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे’ असे म्हणू शकतो.

त्यामुळे असे प्रवक्ते नेमले जातात; जे आपल्या मनातले जनतेसमोर ,माध्यमांसमोर, कार्यकर्त्यांसमोर वाट्टेल त्या भाषेत मांडू शकतील. त्याची भाषा क्वचित शिवराळ असली तरी ती प्रवक्त्याची भाषा समजली जाते; त्या पक्षाची किंवा नेत्याची नाही. आता तुझ्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, पक्ष प्रवक्त्याची नेमणूक करताना काही पथ्ये पाळली पाहिजेत किंवा त्यांच्यावर अंकुश कसा ठेवायचा यासंबंधीचा आहे. यावर माझे असे उत्तर आहे की, स्वतःच्या मनातील असे काही न बोलता पक्षप्रमुखांनी प्रवक्त्याला काय बोलायचे हे लिहून द्यावे आणि जे लिहून दिले आहे तितकेच आणि तेवढेच त्याने माध्यमांसमोर मांडले पाहिजे. या विचारांशिवाय इतर काही बेताल वक्तव्ये केल्याबरोबर त्या प्रवक्त्याला तत्काळ बरखास्त करून दुसर्‍याची नेमणूक केली पाहिजे.

– झटका

Back to top button