तडका : गोंधळात गोंधळ | पुढारी

तडका : गोंधळात गोंधळ

निवडणुकांचे दोन टप्पे पार पडून तिसर्‍या टप्प्यामधील प्रचार टिपेला पोहोचलेला आहे. ज्या दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले, तेथील मतदारांची अवस्थासुद्धा मती कुंठीत व्हावी अशी आहे. पायलीचे पन्नास पक्ष आणि त्यांच्याबरोबर प्रचंड संख्येने असलेले बंडखोर आणि अपक्ष यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत एवढा गदारोळ उडविला आहे की, जनतेलाही काही समजेनासे झाले आहे. ऊन लागून अचानक चक्कर आल्यानंतर माणूस जसा गपकन खाली बसतो, तशी जनतेची अवस्था झाली आहे.

पूर्वी ढोबळमानाने काँग्रेस म्हणजे पंजा, भाजप म्हणजे कमळ, राष्ट्रवादी म्हणजे घड्याळ आणि शिवसेना म्हणजे धनुष्यबाण अशी चिन्हे असत. मतदाराला त्यामधून निवड करणे सोपे जात असे आणि तो मनाशी खूणगाठ बांधून त्याप्रमाणे मतदान करत असे. आता तसे राहिले नाही. राष्ट्रवादी फुटून एका गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. नुसते तुतारी म्हटले तर समजण्यासारखे होते; परंतु तुतारी फुंकणारा माणूस हे ते खरे चिन्ह आहे. शिवसेनेमधील पक्ष फुटीनंतर उर्वरित गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. चित्र रंगीत असेल तर मशाल पेटलेली दिसते; परंतु शुभ्रधवल म्हणजे ‘ब्लॅक अँड व्हाईट’ असेल तर ते आईस्क्रीमच्या कोनसारखे दिसते. ही झाली प्रमुख पक्षांची चिन्हे.

अपक्षांना मिळालेली चिन्हे मात्र मतदारांपर्यंत पोहोचविणे खरोखर कठीण बाब आहे. चिन्हांची ऑफर ठेवताना निवडणूक आयोग जनतेच्या रोजच्या वापरातील वस्तू चिन्ह म्हणून उपलब्ध करून देत असते. जसे की प्रेशर कुकर, शिट्टी, क्रिकेटची बॅट, पतंग, म्हणजे जेणेकरून जनतेला या चिन्हांची ओळख लवकर पटावी, अशी अपेक्षा आहे. नुकत्याच पार पडलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हे उर्वरित गटाकडून मशाल या चिन्हावर लढत होते आणि त्यांच्या विरोधात असणारे रासपचे उमेदवार हे शिट्टी या चिन्हावर लढत होते. मशाली वाटणे सोपे नव्हते.

संबंधित बातम्या

तरीही स्वर्गीय कवी सुरेश भट यांची रचना असलेले आणि आशा भोसले यांनी गायिलेले गाणे मशालवाल्यांनी आपल्या रिक्षांच्या भोंग्यांवर भरपूर वाजवले. ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली…’ आता मशाल विझते की पेटते आणि उष:काल कोणाचा होतो आणि काळरात्र कोणाची येते हेसुद्धा निवडणुकीच्या निकालानंतरच समजणार आहे. शिट्टी वाटणे मात्र सोपे होते. सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष बंडखोर यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले आहे. सगळ्यात सोपे म्हणजे आपल्या सगळ्या मतदारांना छापील लिफाफा देऊन आपले चिन्ह पोहोचविता येऊ शकते.

इतर चिन्हांत प्रेशर कुकर हे बर्‍यापैकी लोकप्रिय चिन्ह आहे. हे चिन्ह निवडताना अपक्ष उमेदवार काही एक विचार करत असावेत. घर म्हटल्यानंतर स्वयंपाकघर आले व स्वयंपाक आला. अर्थात, कुकर आलाच. बाकी पतंग हा भरारी मारण्यासाठी प्रसिद्ध असतो. अपक्षांचा पतंग भरारी मारतो की खाली येऊन कोसळतो, हे निकालानंतरच कळणार आहे. पतंग चिन्ह असणार्‍या अपक्षांच्या रिक्षांच्या भोंग्यांवर ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’ हे गाणे वाजत आहे. विविध चिन्हांमुळे राज्यात, देशात गोंधळात गोंधळ निर्माण झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Back to top button