मत कुणाला द्यावे? | पुढारी

मत कुणाला द्यावे?

राजाराम ल. कानतोेडे

भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे। आपल्या मतावरीच साचे॥ एकेक मत लाखमोलाचे।
ओळखावे याचे महिमान॥

ही आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेतील दहाव्या अध्यायातील ओवी. देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मंगळवारी (दि. 30 एप्रिल) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. ग्रामगीतेतील दहाव्या अध्यायात त्यांनी मतांचे महत्त्व सांगून मत कुणाला द्यावे, याचे मार्गदर्शन केले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर असे असून, अमरावती जिल्ह्यातील शहीद यावली गावात त्यांचा जन्म 1909 मध्ये झाला. त्यांनी लहानपणी परिस्थितीचे चटके सहन केले. विदर्भात राष्ट्रसंतांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे, तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. जपानमध्ये जाऊन त्यांनी जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांना अटक झाली होती. काही काळ तुरुंगात काढला. देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी ग्रामगीता लिहून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले.

ग्रामगीतेत त्यांनी ग्रामजीवनाच्या प्रत्येक पैलूचा विचार मांडला आहे. देव, धर्म, वर्ण, संसार, संपत्ती, जीवन शिक्षण अशा सगळ्या पैलूंचा उलगडा त्यांनी केला आहे. केवळ चौथी शिकलेल्या राष्ट्रसंतांनी 50 पेक्षा जास्त ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांना ही ऊर्जा कोठून मिळाली, याचा विचार केला तर त्यांच्या आयुष्याचे विविध पैलू समोर येतात. राष्ट्रपती भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून गौरविले. राष्ट्रसंतांनी विविध प्रकारचे लेखन केले असले तरी त्यात ग्रामगीतेला विशेष महत्त्व आहे.

ग्रामगीतेतील दहाव्या अध्यायात मतदानाचे महत्त्व सांगितले आहे. ते म्हणतात, लोकशाहीत मताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मत कुणाला द्यावे, त्याच्यातील धोके कोणते, यासंबंधी त्यांचे विचार उद्बोधक आहेत. नातीगोती, जातपात, पक्ष-पंथ, गरीब- श्रीमंत हे निकष वापरून कोणी मतदान करू नये. चोरून सापाला दूध पाजले, वाघाशी जवळीक केली, कुणाच्या आग्रहाने विष घेतले तरी ते आपल्या नाशाला कारणीभूत ठरणारे आहे. जे इमानदार असतील, सर्वांची सेवा करत असतील, त्यांना मत द्यावे. नेतृत्व सेवा केल्याने मिळते, हा विचार महत्त्वाचा आहे.

मत हें दुधारी तलवार। उपयोग न केला बरोबर।
तरि आपलाचि उलटतो वार। आपणावर शेवटीं॥

राष्ट्रसंत म्हणतात की, मत हे दुधारी अस्त्र आहे. त्याचा योग्य उपयोग केला नाही तर तो वार आपल्यावरच उलटतो. अयोग्य व्यक्तीस मत दिले, तर दुर्जन शिरजोर व्हायला मदत होते. मतदान करमणूक नाही. मतदार ही खरेदी करण्याची गोष्ट नाही. मतदान हे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी अचूक व्यक्तीस देण्याची संधी असते. ज्याचे काम अधिक मोलाचे, त्याला मतदाराने निवडून द्यावे.

गावी होती निवडणुका। माणसे होती परस्परात साशंकी॥ कितीतरी पक्ष पक्षांनी दुःखी। व्यवहारा माजी॥

अशाने गावाची दुर्दशा होते. मतांचा गलबला होतो. कोण बरोबर कोण चुकीचा, हा प्रश्न लोकांसोबत उभा राहतो. या गलबल्यात सज्जन मात्र निराश होतो. म्हणून साध्याबरोबर साधनांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

दुर्जन होतील शिरजोर। आपुल्या मताचा मिळतां आधार॥ सर्व गांवास करितील जर्जर। न देतां सत्पात्रीं मतदान॥

आजच्या काळाची मागणी जरा वेगळी आहे आणि ती म्हणजे प्रत्येकाने आपले काम इमानदारीने करावे. सर्वांनी आपल्या मर्यादांचे भान ठेवावे. आपल्यापुढे जे कर्तव्य असेल, त्याच्या सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घेणे याचा अर्थ ब्रह्मज्ञान होय. मी जे काम करत आहे, ते अधिक सुंदर करणे, अधिक व्यवस्थित करणे हाच माझा धर्म आहे. तीच माझी पूजा आहे, तीच माझी साधना आहे. परोपकार म्हणजे पुण्य व परपीडा म्हणजे पाप होय, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांना आपलेसे वाटतील, असे आहेत.

Back to top button