मूलभूत समस्यांवरून अधिकारी धारेवर; बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटीची बैठक | पुढारी

मूलभूत समस्यांवरून अधिकारी धारेवर; बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटीची बैठक

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात नुकतीच मोहल्ला कमिटीची बैठक पार पडली. या वेळी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरून समितीच्या सदस्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या रस्त्यांची झालेली दुरवस्था, सांडपाणी वाहिन्यांचा प्रश्न, तुटलेले चेंबर, रस्त्यांवरील राडारोडा, घनकचरा आदी समस्यांबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अधिकारी उत्तर देऊ शकले नाही.

मोहल्ला कमिटी सदस्य व पुणे सिटीजन अवेअरनेस फोरमचे अध्यक्ष दिलीप मेहता यांनी प्रभागातील ड्रेनेज, कचरा, पदपथावरील अनधिकृत फ्लेक्स, डिजिटल बोर्ड व वृक्ष संवर्धनासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. त्याबाबत अधिकार्‍यांनी मुख्य खात्याकडे पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. मात्र, मेहता यांनी याबाबतचे पत्र बैठकीत सादर करण्याची मागणी केली. मात्र, अधिकारी हे पत्र सादर करण्यास असमर्थ ठरले.

पुढील मीटिंग होईपर्यंत नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात व आरोग्यसंदर्भात संबंधित खात्याचे अधिकारी व सहायक आयुक्तांनी गांभीर्याने विचार केला नाही, तर आम्हाला प्रशासनाविरोधात पुढील कारवाई करण्यासाठी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा या वेळी समिती सदस्यांनी दिला. सहायक आयुक्त प्रसाद भांगे, स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक राजाराम ननावरे, ऋषिकेश शहा, बापू विरूळे, नितीन बिबवे, घनश्याम मारणे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक काथवटे, निरीक्षक सचिन पवार, सहायक अभियंता दीपक सोनवणे, विविध खात्यांचे शाखा अभियंता, सामाजिक कार्यकर्ते आदी या वेळी उपस्थित होते.

प्रशासनात समन्वयाचा अभाव
महापालिकेत एक वर्षापासून प्रशासक राज सुरू आहे. मात्र, नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मुख्य खाते व विभागीय सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकार्‍यांत समन्वयाचा अभाव जाणवत आहे. यामुळे नागरिकांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याचे नितीन बिबवे यांनी सांगितले. ठेकेदाराने काम केल्यानंतर राडाराडा उचललला नसल्याने नागरिकांची, रहिवाशांची गैरसोय होत आहे. पाणीपुरवठा कमी दाबाने येत आहे. वाहतूक पोलिस कार्यालयाशेजारी रहिवासी सकाळी प्रात:विधीला बसतात. मात्र, आरोग्य खात्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

प्रभागांमध्ये रस्त्यावरील खड्डे, राडारोडा आणि कचर्‍याचा प्रश्न बिकट आहे. ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून नीट चालता येत नाही. आरोग्याची समस्या बिकट असताना नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
                                                – दिलीप मेहता, सदस्य, मोहल्ला कमिटी

बिबवेवाडी परिसरात अनेक ठिकाणी ड्रेनेज, चेंबरची झाकणे तुटली आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. लोखंडी साहित्य चोरीला जात आहे. काही ठिकाणी कचर्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महापालिकेच्या मुख्य खात्याकडे पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

                                -प्रसाद भांगे, सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

Back to top button