ऑस्ट्रेलिया महिला संघाचा भारतीय महिला संघावर विजय | पुढारी

ऑस्ट्रेलिया महिला संघाचा भारतीय महिला संघावर विजय

मॅकॉय (ऑस्ट्रेलिया); वृत्तसंस्था : बेथ मुनी (नाबाद 125), निकोला कॅरी (नाबाद 39) आणि मॅकग्राथ (74) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यांत भारतावर 5 विकेटस्ने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 आघाडी घेतली.

275 धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया महिला संघाची सुरुवात चांगली झाली नाही. एलिसा हिली, मेग लॅनिंग (6) आणि एलिसा पेरी (2) या लवकर बाद झाल्याने यजमान संघाची अवस्था ही 3 बाद 34 अशी झाली. यानंतर एशलेग गार्डनर (12) देखील माघारी परतल्याने संघाच्या अडचणी वाढल्या; पण यानंतर सलामीवीर बेथ मुनी आणि तहलिआ मॅकग्राथ (74) यांनी संघाचा डाव सावरला. दीप्‍ती शर्माने मॅकग्राथला बाद करीत ही भागीदारी मोडीत काढली. मॅकग्राथने अर्धशतकी खेळीत 9 चौकार मारले. यानंतर आलेल्या निकोला कॅरीनेदेखील मुनीला चांगली साथ दिली. दरम्यान, बेथ मुनीने शतकी खेळी करीत संघाला विजयाच्या जवळ नेले. सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला होता. मात्र, बेथ मुनी (125) आणि निकोला कॅरी (39) यांनी नाबाद खेळी करीत संघाला 5 बाद 275 धावसंख्येपर्यंत पोहोचवत विजय मिळवून दिला.

त्यापूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा (22) यांनी पहिल्या विकेटस्साठी 74 धावांची भागीदारी केली. मानधना आणि ऋचा घोष यांनी संघाला अडचणीतून बाहेर काढले. त्यांनी चौथ्या विकेटस्साठी अर्धशतकी भागीदारी रचली; पण मानधनाला मॅकग्राथने बाद करीत ही भागीदारी मोडीत काढली. मानधनाने 86 धावांची खेळी केली. घोष 44 धावांवर माघारी परतली. यानंतर दीप्‍ती शर्मा (23), पूजा वस्त्रकार (29) आणि झुलन गोस्वामी (28) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने 7 बाद 274 धावसंख्येपर्यंत मजल मारली.

Back to top button