राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असताना खिडकीचे गज कापून पळून जाणार्या आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणार्या चौघांना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा शुक्रवारी (दि. 3) सुनावली. विनोद सुभाष जाधव (वय 41),आबासाहेब बाबासाहेब लांडगे (वय 40 दोघेही रा. राहता, जि. अहमदनगर), सलीम ऊर्फ पाप्या ख्याजा शेख (वय 46), सागर शिवाजी काळे (वय 31, दोघेही रा. कालिकानगर, शिर्डी, जि. अहमदनगर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
या खटल्याची माहिती पुढीलप्रमाणे : शिर्डी पोलिस ठाण्यांतर्गत खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेले विनोद जाधव,आबासाहेब लांडगे, सलीम ऊर्फ पाप्या शेख, सागर काळे हे पोलिस कोठडीत असताना 28 एप्रिल 2014 रोजी रात्री खिडकीचे गज कापून फरार झाले होते. गुप्त खबर्यांच्या माहितीनुसार ते मंचर (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिर्डी पोलिसांचे पथक आरोपींना पकडण्यासाठी मंचर हद्दीत आले. शिर्डी व मंचर पोलिसांनी आरोपींचा माग काढला. 1 मे 2014 रोजी हे आरोपी गावडेवाडी – वाफगाव रस्त्याने पोलिसांना गुंगारा देत पळून जात होते. त्यांना पोलिसांनी शरण येण्यास सांगितले. मात्र, ते पुढे जाऊ लागले.
त्यांना पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता ते दुचाकी (एमएच 17 एएच 7319) वरून पळून जाऊ लागले. पोलिस आडवे आले असता त्यांनी दुचाकी पोलिसांच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. यामध्ये काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. तरीही पोलिसानी त्यांना पकडले. आरोपी सलीम ऊर्फ पाप्या शेख याच्याकडून एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे हस्तगत केली. शिर्डी ठाण्याचे जखमी पोलिस निरीक्षक संपत भोसले यांनी मंचर ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास मंचर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन जाधव यांनी केला. हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होता. त्याचा निकाल शुक्रवारी मुख्य न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी दिला. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक अभियोक्ता मिलिंद पांडकर यांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असा युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या खटल्याचे न्यायालयातील पोलिस कामकाज हवालदार सुनीता बटवाल यांनी पाहिले.
हेही वाचा