टी नटराजनची कोरोना रिप्लेसमेंट जम्मू काश्मीर मधून मिळाली! | पुढारी

टी नटराजनची कोरोना रिप्लेसमेंट जम्मू काश्मीर मधून मिळाली!

पुढारी ऑनलाईन डेस्क

सनरायझर्स हैदराबादच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या टी नटराजनची कोरोना रिप्लेसमेंट संघाला मिळाली आहे. सनरायझर्स हैदराबादने ट्विट करुन टी नटराजनची कोरोना रिप्लेसमेंट म्हणून उमरान मलिकची निवड केल्याचे सांगितले.

कोरोनामुळे पुढे ढकलेला आयपीएलचा १४ वा हंगाम पुन्हा एकदा युएईमध्ये सुरु झाला. मात्र सनरायझर्स हैदराबादच्या टी नटराजनचा कोरोना अहवाल २२ सप्टेंबरला दिल्लीबरोबर झालेल्या सामन्यापूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सपोर्ट स्टाफ आणि डॉक्टरांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. टी. नटराजनला १० दिवसांचे विलगीकरण सक्तीचे असणार आहे.

त्यामुळे हैदराबादला टी नटराजनची कोरोनी रिप्लेसमेंट शोधावीच लागणार होती. आज या रिप्लेसमेंटची घोषणा संघाने ट्विट करुन केली. त्यांनी जम्मू काश्मीरच्या उमरान मलिकला आपल्या संघात स्थान दिले आहे. मलिकने जम्मू काश्मीरकडून एक टी २० आणि अ श्रेणीतील सामना खेळला आहे. त्याने एकूण ४ विकेट घेतल्या आहेत.

मलिक सध्या सनरायझर्स हैदराबादचा नेट बॉलर म्हणून संघासोबतच आहे. मलिकला हैदराबादने नियम क्रमांक ६.१ ( क ) नुसार आपल्या संघात घेतले आहे. या नियमानुसार फ्रेंचायजी जोपर्यंत जुना खेळाडू संघातील बायो सिक्युर वातावरणात परतत नाही तोपर्यंत त्याच्या जागी शॉर्ट टर्म रिप्लेसमेंट मिळू शकते.

यामुळे उमरान मलिक जोपर्यंत टी नटराजन संघात परतत नाही तोपर्यंत तो सनरायझर्सचा भाग असणार आहे. सनरायझर्स हैदराबाद सध्या गुणतालिकेत तळात आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादला आठ विकेट्सनी मात दिली. आता हैदराबाद आपला पुढचा सामना पंजाब किंग्ज बरोबर शनिवारी खेळणार आहे.

Back to top button