पिंपरी : एमआयडीसीत बत्ती गूल; लाखोंचे नुकसान | पुढारी

पिंपरी : एमआयडीसीत बत्ती गूल; लाखोंचे नुकसान

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  राज्यासह संपूर्ण जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वीज कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी बुधवार (दि. 4) पासून संप पुकारला होता. या संपामुळे कुदळवाडी, सेक्टर सात आणि टी ब्लॉगमधील वीजपुरवठा सकाळी सव्वाआठ ते दुपारी सव्वाबारापर्यंत खंडीत झाला होता. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक कंपन्यांतील उत्पादनाच्या कामाचा खोळंबा झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली. राज्य शासनाने खासगी कंपनीला वीज वितरण क्षेत्रात समांतर परवाना देण्याचे धोरण अवलंबिले आहे. यांस विरोध म्हणून राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांतील कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी बुधवार (दि. 3) पासून तीन दिवसांचा संप पुकारला होता.

आंदोलनादरम्यान नागरिकांचा वीजपुरवठा खंडित झाल्यास तक्रारींसाठी म्हणून महावितरण कंपनीने टोल फ—ी क्रमांक दिला असला तरी या क्रमांकावर शहराच्या कानाकोपर्‍यातून तक्रारींचा पाऊस पडला; मात्र त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचे उत्तर टोल फ—ी क्रमांकावरून येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
कुदळवाडी तसेच एमआयडीसीमधील टी ब्लॉकमधील लघू उद्योजक व्यावसायिकांचा चार ते पाच तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. मेंटेनन्स, फीडरची सुरू असलेली कामे खोळंबली होती. तसेच ज्या भागात वीजपुरवठा खंडित झाला तेथील समस्या निराकरणासाठी वेळेवर कर्मचारी न पोहोचल्याने बराच वेळ वीजपुरवठा खंडीत होता. परिणामी औद्योगिक उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.

निगडी डेपोतील इलेक्ट्रिक बसेस फूल चार्ज

वीज वितरणमधील कर्मचारी, अधिकारी यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निगडी डेपोमधील सर्व इलेक्ट्रिक बसेस मंगळवारी रात्री चार्जिंग करण्यात आल्याने बुधवारी संपादरम्यान वाहतूक सुरळीत सुरू होती. डेपोमधील वीजपुरवठा सकाळी अकरा ते बारापर्यंत खंडित झाला होता. मात्र, बसेस पूर्ण चार्ज असल्याने गाड्या रस्त्यात बंद पडल्याचा प्रकार घडला नाही. परंतु, पुणे विभागातील वाघोली येथे वीजपुरवठा बर्याच काळ खंडित झाल्याने डेपोतील इलेक्ट्रिक बस बंद होत्या. परिणामी निगडी डेपोमधून वाघोली मार्गावर 336 क्रमांकाच्या धावणार्या बारा बसमध्ये आणखी दोन ज्यादा गाड्या वाढविण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय टळली, अशी माहिती आगारातील अधिकार्यांनी दिली.

वीज कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी बुधवारपासून संप पुकारला होता. संपादरम्यान शहरातील वीजपुरवठा खंडीत झाल्यास चोवीस तासांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महावितरण कार्यालयाने दिली. मात्र, एमआयडीसीमध्ये सकाळी चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता. कार्यालयाने दिलेल्या आपत्कालीन क्रमांकाशी संपर्क साधला असता कर्मचारी नसल्याने वेळेवर समस्याचे निराकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले.
                         – संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना.

महावितरण कर्मचारी व अधिकार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे परिसरातील लहान मोठ्या उद्योजकांना याचा फटका बसला आहे. कर्मचार्‍यांना संप करण्याची परवानगी नसतानाही असे कृत्य होत आहे. महावितरणचे खासगीकरण होणे गरजेचे आहे. त्याशिवाय नागरिकांना योग्य सेवा मिळणार नाही.

.- गोविंद पानसरे, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवड.

Back to top button