हॉटेल, वाहनांचे नुकसान करत बारामतीत तरुणांनी कोयता दाखवत घातला धुमाकूळ | पुढारी

हॉटेल, वाहनांचे नुकसान करत बारामतीत तरुणांनी कोयता दाखवत घातला धुमाकूळ

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात शनिवारी (दि. १६) सायंकाळी कोयता गॅंगने दहशत माजवत धिंगाणा केला. हातात कोयते घेत अनेक ठिकाणी तोडफोड केली. या प्रकारामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मद्यधुंद अवस्थेतील चार ते पाच जणांनी दोन दुचाकीवरुन हातात कोयते घेत शनिवारी सायंकाळी शहरातील पाचहून अधिक हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला. अनेक हॉटेलचे त्यांनी काचा फोडून मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी दुचाकी वाहनांवर या गॅंगने सपासप कोयत्‍याने वार केले. तर चारचाकी वाहनांच्या काचांचा चक्काचूर केला.

या गॅंगने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बारामतीत कायद्याच राज्य आहे की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शहरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. शहरात सायंकाळी चालायला जाणाऱ्यांनी भीतीपोटी घर गाठले आहे. तर काही हॉटेलचालकांनी भीतीपोटी शटर खाली ओढले.

शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील रेल्वे गेटनजिक एकाचा मोबाईल हिसकावत एका दुकानाची मोडतोड केली, तेथून पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकल्यावर पैसे मागणा-या कर्मचा-यांवर कोयत्याने हल्ला केला, मात्र त्याने तो चुकविल्याने पेट्रोल भरण्यास आलेल्या एका व्यक्तीला कोयता लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

त्यानंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयासमोरील दुकान व हॉटेलमध्ये घुसून भांडणे करीत मोडतोड केली. तेथील चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या, या शिवाय एकावर हल्ला केल्यानंतर त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्या नंतर दुचाकीवरुन हातात कोयते दाखवत हे युवक गावभर फिरत होते, काही दुकानांच्या सीसीटीव्हीत हे दृश्य कैद झाल्याचेही समजते.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्‍काळ दोन युवकांना जेरबंद केले असून ते नुकसानीची अधिक माहिती घेत आहेत. मात्र पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षितेताच प्रश्न ऐरणीवर आला आहे. निरपराध नागरिकांना विनाकारण हल्ल्याला सामोरे जावे लागणार असेल तर करायचे काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक इंदापूरला असल्याने सर्वच प्रमुख वरिष्ठ पोलिस अधिकारीही इंदापूरला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे शहरातील या गॅंगला आवरणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Back to top button