पिंपरीत गोळीबार प्रकरणाला मुळशी पॅटर्नची किनार | पुढारी

पिंपरीत गोळीबार प्रकरणाला मुळशी पॅटर्नची किनार

पिंपरी : रिक्षात आलेल्या तिघांनी 6 डिसेंबर रोजी हवेत गोळीबार करून पिंपरी हादरवून सोडली होती. त्यानंतर पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. दरम्यान, पोलिस तपासात नऊजण मिळून माण येथील एका शेतकर्‍याचा खून करणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासाठी त्यांना 45 लाखांची सुपारी देण्यात आली होती.
शाहरुख शेख (29, रा. गुलाबनगर, दापोडी), मोहम्मद आलवी (26, रा पवारवस्ती, दापोडी), फारूक शेख (27, रा. पत्राशेड झोपडपट्टी, चिंचवड), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, अन्य सहा जणांचा शोध सुरू आहे.

गोळीबारीमुळे हत्येचा डाव फसला

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 6 डिसेंबर रोजी अटक आरोपींनी पिंपरी येथे तीन ठिकाणी हवेत गोळीबार करून धुडगूस घातला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकांनी अवघ्या काही तासात तीनही आरोपींना अटक केली होती. अटक आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी हिंजवडी नजीकच्या माण गाव येथील संतोष मोहिते नावाच्या शेतकर्‍याची 45 लाखांची सुपारी घेतल्याचे समोर आले. पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अनिल मोहिते याने ही सुपारी दिल्याची कबुली आरोपींनी दिली.

दरम्यान, आरोपी अनिल मोहिते याने आरोपी मोहम्मद आलवी याच्यासह त्याच्या साथीदारांना ताथवडे येथे बोलवून तीन लाख रुपये रोख दिले. त्यानंतर आरोपींनी उत्तर प्रदेश येथून पिस्तूल व राउंड विकत घेतले. मात्र, संतोष मोहिते यांच्या हत्येचा कट शिजत असतानाच आरोपी आलवी याने आरोपी शाहरुख आणि फारुख यांच्यासोबत पिंपरीत जाऊन गोळीबार केला. या गोळीबारामुळे संतोष मोहिते यांच्या हत्येचा डाव फसला.

अनिल-संतोष मोहिते सख्खे चुलत भाऊ

आरोपी अनिल मोहिते आणि संतोष मोहिते हे सख्खे चुलत भाऊ आहेत. त्यांच्यात मागील काही दिवसांपासून शेतीचा वाद सुरू आहे. त वाद सुरू असलेल्या शेतीची किंमत कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे. यातूनच आरोपी अनिल मोहिते यांनी संतोष यांचा काटा काढण्याचा हा प्लॅन केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

अनिल मोहितेवर खुनासह गंभीर गुन्ह्यांची नोंद

आरोपी अनिल मोहिते हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लोणी काळभोर, हिंजवडी, डेक्कन, यवत, राजगड आणि वाकड पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, 24 फेब—ुवारी 2021 रोजी त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्धदेखील करण्यात आले होते.

पोलिस आयुक्तांनी दिले संरक्षण
आपल्या हत्येची सुपारी दिल्याचे समजतात शेतकरी संतोष मोहिते यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे धाव घेतली. शिंदे यांनीदेखील घटनेचे गांभीर्य ओळखून मोहिते यांच्यासोबत दिवस आणि रात्र पाळीसाठी दोन शस्त्रधारी पोलिस नियुक्त केले आहेत.

 

आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबानुसार अनिल मोहिते याला संतोष मोहिते यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागल्याने अनिल मोहिते फरार झाला आहे. त्याच्या शोधात पथके रवाना करण्यात आली आहे. लवकर अनिल मोहिते याला अटक होईल.
– पद्माकर घनवट, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

 

 

Back to top button