नांदेड : घर फोडून सोने-चांदीसह रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला | पुढारी

नांदेड : घर फोडून सोने-चांदीसह रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

उमरखेड, पुढारी वृत्तसेवा : घरातील मंडळी लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेलेली असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. ५० तोळे सोने, अडीच किलो चांदी व रोख ८० हजार रूपये असा ऐवज चोरट्यांनी दरवाजा तोडून लंपास केला आहे. ही घटना उमरखेडमधील हरीओम संकुल बिल्डींगमध्ये घडली.

कैलास हरिभाऊ शिंदे हे लग्न कार्याच्या निमित्ताने परिवारासह माहुर येथे गेले होते. ते १४ डिसेंबरच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा तोडलेला दिसला व घरातील कपाट फोडलेले दिसले. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नुकतेच खरेदी केलेले ५० तोळे सोने व अडीच किलो चांदी व रोख ८० हजार रुपये असा एकंदरित २८ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे कैलास शिंदे यांनी घरात प्रवेश केल्यानंतर  निदर्शनास आले.

या घटनेची माहिती हरिभाऊ शिंदे यांनी तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ठसे तज्ञांना पाचारण केले. राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील रात्रंदिवस गजबजलेल्या व पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बस स्टँड परिसरात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button