Arjun Tendulkar : अर्जुनच्या शतकावर बहीण सारा तेंडुलकरची भावनिक पोस्ट, म्हणाली.. | पुढारी

Arjun Tendulkar : अर्जुनच्या शतकावर बहीण सारा तेंडुलकरची भावनिक पोस्ट, म्हणाली..

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत रणजी पदार्पणात शतक ठोकले. अर्जुनच्या या ऐतिहासिक खेळीनंतर त्याची मोठी बहिण भावनिक झाली असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळत आहे. ही फक्त सुरुवात आहे. तुझी बहीण असल्याचा मला अभिमान आहे,’ अशी भावना तिने इन्स्टाग्रामवरून व्यक्त केली आहे. (Arjun Tendulkar)

बुधवारी क गटातील सामन्यात गोव्याकडून राजस्थानविरुद्ध खेळताना अर्जुनने 120 धावांची खेळी केली. पाचवी विकेट पडल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी अर्जुन मैदानात उतरलेल्या 23 वर्षीय अर्जुनने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले. त्याने सुयश प्रभुदेसाई (212) सोबत सहाव्या विकेटसाठी 221 धावांची भागीदारी केली आणि गोव्याला 8 बाद 493 धावसंख्येपर्यंत नेले. (Arjun Tendulkar)

अर्जुनने आपल्या वडीलांच्या म्हणजेच सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने 11 डिसेंबर 1988 रोजी पदार्पणाच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबईकडून खेळताना गुजरातविरुद्ध रणजी पदार्पणात नाबाद 100 धावा केल्या. तेव्हा सचिन फक्त 15 वर्षांचा होता. 34 वर्षांनंतर त्याचा मुलगा अर्जुनने राजस्थानविरुद्ध शतक झळवावून इतिहासाची पुनरावृती केली आहे. (Arjun Tendulkar)

वेगवान गोलंदाज अर्जुन सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यावेळी गोव्याची धावसंख्या पाच विकेट्सवर 201 होती. त्याने सुयश प्रभुदेसाईसोबत 221 धावांची भागीदारी केली. अर्जुनच्या यशाने तेंडुलकर कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मोठी बहीण सारानेही आपल्या लाडक्या भावाच्या शतकाचे सेलिब्रेशन केले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत भावाच्या कर्तृत्वाचा अभिमान असल्याचे व्यक्त केले आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक संधी मिळण्यासाठी अर्जुनने मुंबई सोडून गोव्यासाठी खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने यापूर्वी मुंबईसाठी दोन टी-20 सामने खेळले आहेत. यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने अवघ्या 5.69 च्या इकॉनॉमीने धावा देत 7 सामन्यांत 10 बळी घेतले.

 

हेही वाचा;

Back to top button