अल्पवयीन मुलांच्या ‘त्या’ पार्टनरशिपसाठी कॅफेचा ‘राजाश्रय’: पोलिसही मेहेरबान? | पुढारी

अल्पवयीन मुलांच्या 'त्या' पार्टनरशिपसाठी कॅफेचा 'राजाश्रय': पोलिसही मेहेरबान?

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलांना मैत्रीच्या पहिल्या पायरीवर नेऊन हीच मैत्री पुढे टोकाच्या भूमिका घ्यायला भाग पाडणारी म्हणुन शाळा, कॉलेजच्या परिसरात वाढलेले कॅफे ही मोठी समस्या केंद्र निर्माण झाली आहेत. पहिली ओळख, पुढे मैत्री , त्यानंतर कॅफेचा आडोसा आणि लॉजवरची अखेर ही जीवन उध्वस्त करणारी कहाणी अगदी काही दिवसात तयार होताना पाहायला मिळत आहे. अंधार व आडोसा अशी कॅफेंची रचना आणि त्यामध्ये मिळणारी संशयास्पद पेय याकडे तसेच अल्पवयीन मुला- मुलींना थेट प्रवेश देऊन आपला गल्ला भरणारे लॉज चालक यांच्याकडे स्थानिक ग्रामपंचायत , नगरपरिषद प्रशासन किंवा पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातुनच भयानक, किळसवाणे प्रकार घडु लागले आहेत. किशोवयीन मुलांच्या पालकांची झोप उडवणारी ही स्थिती बदलण्याची सामजिक गरज बनली आहे.

राजगुरुनगर शहर परिसरात नुकताच एक गुन्हा खेड पोलीसांनी उघडकीस आणला. महाविद्यालयाच्या आवारात कॅफे मध्ये प्राथमिक ओळख झालेल्या अल्पवयीन मुलींना तीन मित्रांनी फिरायला जायचं सांगुन दारू पाजली. नशा चढली नाही म्हणुन उत्तेजना वर्धक इंजेक्शन दिले आणि नको तो प्रकार घडला. शहरातील या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणुन पहिल्याच वर्षात पदार्पण केलेल्या या मुलींचे पाऊल विनाशाच्या वाटेवरील टोकाचे पाऊल ठरले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या राजगुरुनगर शहराच्या सांस्कृतिक महतीला या घटनेने गालबोट लागले आहे. पुण्याच्या जवळ आणि सामाजिक सलोखा कायम असल्याने राजगुरुनगर शहरात कायम वास्तव्यास मोठी पसंती आहे. अर्ध्याहून अधिक नागरिक बाहेरच्या तालुका,जिल्हा, राज्यातील आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाणारी शुक्रवारची घटना घडली आहे.

पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष दिले पाहिजे. याबरोबरच ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये मुले शिक्षण घेतात. अशा शाळा कॉलेजच्या परिसरात उभे राहणारे कॅफे आणि तसे व्यवसाय यावरही अनुचित प्रकार घडु नयेत यासाठी करडी नजर ठेवली पाहिजे. आक्षेपार्ह प्रकार घडत असल्यास पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे. पुणे- नाशिक महामार्गा लगत लॉजचा सुळसुळाट झाला आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात जास्त पैसे मिळवण्यासाठी नियम डावलून मुलामुलींना सर्रास प्रवेश दिला जातो. अवेळी गस्त घालत पोलीसांनी अशा लॉजवर कायम स्वरुपी कडक कारवाई केली पाहिजे अशी पालकांची मागणी आहे. पोलीसांनी आर्थिक तडजोडी केल्या नाही तर अशा अनेक लॉजवर बंदी येऊ शकते असे बोलले जात आहे.

.. इथे सेक्स रॅकेट बरोबर कोयता संस्कृतीत होतेय वाढ?

सेक्स रॅकेट उघडकीस आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.अल्पवयीन मुला मुलींना गुटखा, गांजा आणि हातभट्टीची दारू सहज उपलब्ध होत असल्याचा संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. कौटुंबिक पार्श्वभूमी साधारण असताना चैनाबाजी करण्याचे आकर्षण ग्रामीण भागात वाढत आहे.त्यातुनच खेड तालुक्यात कोयता संस्कृतीत देखील झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गंभीर गुन्हा करण्याची ताकद निर्माण करणारी ही केंद्र वाढत आहेत.

नशा देणारे पदार्थ, पेय ज्या ठिकाणी मिळतात असे स्पॉट पोलिसांच्या मेहेरबानी मुळे सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.अगोदरच अपुरे त्यात निवडणूका, प्रचार सभा, आंदोलने, ट्रॅफिक यात पोलिस बळ कामी लागत असल्याचे सांगितले जाते . मग हुतात्मे,महात्मे, संत,क्रांतिकारकांची भूमी असलेल्या खेड, आळंदी, चाकण सारख्या शहरांच्या संस्कृतीचा -हास होण्याचे मुळ असलेल्या प्रश्न, समस्या कुणी निस्तरायच्या असा प्रश्न गांभीर्याने विचारला जात आहे. सेक्स रॅकेट अथवा कोयता संस्कृतीत फक्त सर्वसामान्य कुटुंबातली नाही तर चांगल्या, सधन कुटुंबातील मुल – मुली भरडली जाऊ लागली आहेत.

हेही वाचा

मागोवा! नानासाहेब गोरे : उत्कृष्ट संसदपटू अन ब्रिटनचे उच्चायुक्तही..

कोलकात्याची लिची पुण्याच्या बाजारात; हंगाम सुरू झाल्याने आवक वाढली

Back to top button