Gujarat Election 2022 Results : सलग सातव्‍यांदा गुजरातमध्‍ये ‘कमळ’ फुलले, भाजपच्‍या अभूतपूर्व यशामागील ‘ही’ आहेत प्रमुख कारणे | पुढारी

Gujarat Election 2022 Results : सलग सातव्‍यांदा गुजरातमध्‍ये 'कमळ' फुलले, भाजपच्‍या अभूतपूर्व यशामागील 'ही' आहेत प्रमुख कारणे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपच्‍या यशाचे वर्णन हे अभूतपूर्व आणि ऐतिहासिक या शब्‍दांमध्‍येच करावे लागेल. कारणही तसेच आहे. ( Gujarat Election 2022 Results) यंदाच्‍या निवडणुकीत भाजपने एकूण १८२ जागांपैकी १५२ जागांवर आघाडी घेत नवा विक्रम प्रस्‍थापित केला आहे. काँग्रेसच्‍या पदरी गेल्‍या सहा निवडणुकीतील सर्वात नामुष्‍कीजनक पराभव पडला आहे. जाणून घेवूया, गुजरातमधील भाजपच्‍या ऐतिहासिक विजयामागील प्रमुख कारणे…

Gujarat Election 2022 Results : नरेंद्र मोदी यांचा करिष्‍मा

मागील २०१७ च्‍या निवडणुकीत पक्षाला केवळ ९९ जागांवर समाधान मानवे लागले होते. काँग्रेसने ७७ जागा जिंकत आपले अस्तित्व जिवंत ठेवण्‍यात यश मिळवले होते. तसेच २०१२ च्‍या तुलनेत काँग्रेसच्‍या १६ जागा वाढल्‍या होत्‍या. त्‍यामुळे यंदाची गुजरात विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासाठी प्रतिष्‍ठेचा मुद्दा ठरली होती. तसेच या निवडणूक निकालाचे परिणाम २०२४ लोकसभा निवडणुकीवरही होणार असल्‍याने भाजपनेही मागील एक वर्षापासून निवडणुकीचा रणनीती आखण्‍यास सुरुवात केली होती.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरू केलेल्या सुमारे 10 दिवसांच्या गुजरात गौरव यात्रेत अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला. 12 आणि 13 ऑक्टोबर २०२२ रोजी राज्यांच्या विविध भागांत सहा यात्रा निघाल्या.19 आणि 20 ऑक्टोबर रोजी गांधीनगर, जुनागड, राजकोट, केवडिया आणि व्यारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्यांनी 15,670 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली होती. गुजरातमध्‍ये नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेत स्‍थानिकांशी थेट संवाद साधत आपल्‍या जुन्‍या रणनीती प्रमाणे यश मिळवले. आपल्‍या प्रत्‍येक भाषणात ते गुजरातमधील जनतेबाबत कृतज्ञता व्‍यक्‍त करत होते. नरेंद्र मोदी यांची मान उंचावेल असेच त्‍यांचे समर्थन करु असा सूर निवडणुकीपूर्वीच गुजरातमधील विविध मतदारसंघामधून उमटत होता. नरेंद्र मोदी यांचा करिष्‍मा हे भाजपच्या ऐतिहासिक यशामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे.

राहुल गांधींसह काँग्रेसच्या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांची गुजरातकडे पाठ

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र माोदी यांचा गुजरातमध्‍ये प्रचाराचा झंझावत सुरु असतना कााँग्रेसच्‍या राहुल गांधींसह ज्‍येष्‍ठ नेत्‍यांनी प्रचाराकडेच पाठ फिरवली. काँग्रेसचे नेते नेते माोहनिसिन रथवा आणि हिमांशु व्‍यास यांनी निवडणुकीच्या आधी काही दिवस भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्‍यस्‍त आहेत. तसेच काँग्रेसच्या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांनीही प्रचाराकडेच पाठ फिरवली, असा अप्रत्यक्ष संदेश गेला.

Gujarat Election 2022 Results : आपने घेतली काँग्रेसची मते

यंदा आम आदमी पार्टीने रिंगणात उडी घेतल्‍याने गुजरात विधानसभा निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. भाजप आणि इतर पक्षांच्या तुलनेत आम आदमी पाटीने लवकर प्रचाराला सुरुवात केली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे आपचा आत्‍मविश्‍वास वाढला होता. आम्‍ही गुजरातमधील जनतेला तिसरा पर्याय उपलब्‍ध करुन दिल्‍याचे दावा आप करत होते. २२ टक्‍के मतांसह आम आदमी पार्टी विरोधी पक्ष बनेल, असेही एका अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्‍यात आला होता. २०१७ च्‍या निवडणुकीत काँग्रेसला ७७ जागा मिळाल्‍या होत्‍या. मात्र यंदा केवळ २० जागांवरच आघाडीवर राहिली. तर आम आदमी पार्टीला दोन अंकी संख्‍याही गाठता आली नाही. आपने काँग्रेसच्‍या मतांचे विभाजन केले असे आता मानले जात आहे.

पाटीदार समाजाचे भाजपला समर्थन

गुजरात विधानसभेत एकुण १८२ जागा आहेत. यातील तब्‍बल ७० मतदारसंघांमध्‍ये पटेल-पाटीदार यांचे मतदान निर्णायक ठरते. २०१७ विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदारांचे आरक्षणासाठी झालेल्‍या आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसला होता. कारण या निवडणुकीत भाजप १००चा आकडाही पार करु शकले नाही. या निवडणुकीत पाटीदाराचा बालेकिल्‍ला मानला जाणार्‍या सौराष्‍ट्रमध्‍ये भाजपला सर्वाधिक फटका बसला होता. येथील ५६ पैकी ३२ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. भाजपला केवळ २२ जागांवरच समाधान मानावे लागले होते. २०१२ विधानसभा निवडणुकीत भाजपचे तब्‍बल ३२ आमदार हे पाटीदार समाजाचे होते. २०१७ मध्‍ये ही संख्‍या २८ झाली. तर काँग्रसचे २० पाटीदार आमदार जिंकले होते. गुजरातमधील एकूण १२ टक्‍के मतदान हे पाटीदार समाजाचे आहे. हा समाज दोन गटात विभागला गेला होता. कडवा पटेल आणि लेउवा पटेल असे त्‍यांना ओळखले जाते. हार्दिक पटेल हे कडवा पटेल समाजातील आहेत. नरेश पटेल आणि परेश गजेरा हा लेउवा पटेल आहेत. पाटीदार मतदानात कडवा पटेल ६० टक्‍के, लेउवा पटेल ४० टक्‍के आहेत. लेउवा पटेल यांचा सौराष्‍ट्र-कच्‍छ परिसरातील राजकोट, जामनगर, भावनगर, अमरेली, जूनागड, पोरबंदर, सुरेंद्रनगर, कच्‍छ या जिल्‍ह्यात लेउवा पटेलांचे दबदबा आहे. तर मेहसाणा, अहमदाबाद, कडी-कलोल, विसनगर परिसरात कडवा पटेल समाजाचे वर्चस्‍व आहे.

गुजरातमध्‍ये पाटीदार समाज हा मागील अनेक वर्ष भाजपचा कट्‍टर समर्थक राहिला आहे. मतांची टक्‍केवारी पाहिली तर पाटीदार समाजाचे ८० ते ८५ टक्‍के मतदान हे भाजपला होते . विशेष म्‍हणजे, २०१७ मध्‍ये हार्दिक पटेल यांच्‍या अमानत आंदोलनावेळी पाटीदार समाजातील तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. त्‍यामुळे भाजपविरोधात संतापाची लाट पसरली होती.तरीही या निवडणीकीत पाटीदार समाज हा पूर्णपणे भाजपच्‍या विरोधात गेला नव्हता.

हार्दिक पटेल हे पाटीदार आरक्षण आंदोलनातून समोर आले. मागील विधानसभा निवडणुकीत त्‍यांनी भाजपविरोधात प्रचाराचे रान उठवले. २०१७ मध्‍ये भाजपला केवळ ९९ जागांवरच समाधान मानावे लागले होते. बहुमत मिळविण्‍यासाठी हा आकडा पुरेसा होता. मात्र भाजपच्‍या जागांमध्‍ये झालेली घट ही चिंताजनक होती. हार्दिक पटेल यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील आंदोलनामुळे भाजपच्‍या मतांची टक्‍केवारी घसरली होती. अखेर काँग्रेसमधील अंतर्गत वादाला कंटाळून हार्दिक पटेल यांनी गुजरात विधानसभेच्‍या तोंडावर भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे. त्‍यांच्‍या पाटीदार आरक्षण आंदोलन समितीनेही भाजपला समर्थन दिले. भाजप हाच पक्ष तरुणाईचे भविष्‍य आहे, असा प्रचार हार्दिक पटेल यांनी केला. पाटीदार समाजाचे समथर्थन हा भाजपच्‍या विजयातील प्रमुख कारण ठरले.

हेही वाचा :

 

 

 

 

Back to top button