UP By poll Result : डिंपल यादवांवर अखिलेश यांचे लाखोंचे उधार | पुढारी

UP By poll Result : डिंपल यादवांवर अखिलेश यांचे लाखोंचे उधार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील (UP By poll Result) मैनपुरी लोकसभा मतदारसंघ आणि रामपूर सदर आणि खतौली विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या समाजवादी पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. तर भाजपने सपाचे माजी खासदार आणि आमदार रघुराज सिंह शाक्य यांना रिंगणात उतरवले आहे. दोघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळतेय. डिंपल यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे कौटुंबिक प्रतिष्ठेचे कारण ठरलं आहे. म्हणूनचं आपली पत्नी डिंपलसाठी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी जोरदार प्रचार आणि प्रसार केला. (UP By poll Result )

शिवपाल यादवांचा गड – जसवंतनगर

अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव निर्णायक आघाडीच्या दिशेने आहेत. जसवंत नगरमध्ये डिंपल यादव ८० हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रघुराज शाक्य पिछाडीवर आहेत. धौलपूरमध्येदेखील डिंपल आघाडीवर होते. मैनपुरी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या जसवंतनगर, करहल, भोगांव, किशनी आणि मैनपुरी सदर या पाच ठिकाणी डिंपल यादव आघाडीवर आहेत. ‘शिवपाल यादवांचा गड’ अशी ओळख असलेल्या ‘जसवंतनगर’मध्येही डिंपल यादव आघाडीवर आहेत.

डिंपल यादव यांच्याविषयी जाणून घ्या

डिंपल या दोन वेळा खासदार म्हणून निवडणून आल्या आहेत. तर दोन निवडणुकीत त्यांना पराभवदेखील स्वीकारावा लागला होता. २०१९ लोकसभा निवडणुकीवेळी डिंपल यांनी कनौजमधून निवडणूक लढवली होती. तेव्हा भाजपच्या सुब्रत पाठक यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

जाणून घ्या संपत्तीविषयी-

डिंपल यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती माहिती दिली आहे. यानुसार, त्यांच्याकडे लखनौ आणि सैफईमध्ये जमीन आहे. मागील दहा महिन्यात त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे, अशी माहिती एका वेबसाईटने दिलीय.

डिंपल-अखिलेश यांच्या संपत्तीत घट

मीडिया रिपोर्टनुसार, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अखिलेश यादव यांनी आपली एकूण संपत्ती ४० कोटी १४ लाखांहून अधिक सांगितली होती. दहा महिन्यात संपत्तीत घट होऊन ३९ कोटी ९१ लाख ५० हजार ४१६ रुपये झाली आहे. २००४ ते आतापर्यंत अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांनी जितक्यावेळा निवडणूक प्रतिज्ञापत्र दाखल केलं, त्या-त्यावेळी त्यांच्या संपत्ती वाढ झालेली दिसून आलीय. पण, पहिल्यांदा असं झालं आहे की, डिंपल-अखिलेश यांच्या संपत्तीत घट झालीय. या प्रतिज्ञापत्रानुसार, डिंपल यांच्याजवळ सव्वा लाखांचा कॉम्प्युटर आणि ६० लाखांचे दागिने आहेत. पण कार वा बाईक नाही. तर अखिलेश यांच्या नावावर ७६ हजारांचा फोन, जवळपास साडे पाच लाखांची व्यायाम मशीन आहे. पण, त्यांच्या नावे कुठलीही गाडी नाही.

लाखोंचे दागिने, लखनौ-सैफईमध्ये जमीन

डिंपल यांच्याजवळ जवळपास ६० लाख रुपयांचे दागिने आहेत. यामध्ये सोने, चांदी, हिरे आणि मोतींची आभूषणे आहेत. याशिवाय लखनऊ आणि सैफईमध्ये डिंपलच्या नावे जमिनी आहेत. डिंपलने १९९३ मध्ये आर्मी पब्लिक स्कूल, लखनऊमधून शालेय शिक्षण घेतले आहेत. १९९८ मध्ये बीकॉमची पदवी घेतलीय. २०१२ आणि २०१४ मध्ये दोन वेळा डिंपल कनौज लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

अखिलेश यांनी डिंपल-मुलायम यांना दिले उधार पैसे

अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपलला २० लाख उधार दिलं आहे. तर वडील मुलायम सिंह यादव यांना २ कोटी १३ लाखांहून अधिक उधार दिलं होतं. डिंपलने देखील गोविंद वल्लभ चतुर्वेदी आणि राम चतुर्वेदी नावाच्या दोघांनाही उधार दिलं आहे.

२००९ ते २०१२ पर्यंत सात कोटी रुपये वाढली संपत्ती

डिंपल यादव यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. फिरोजाबाद मतदारसंघातून त्यांनी पोटनिवडणुकीत काँग्रेसचे राज बब्बर यांचा सामना केला होता. परंतु, या निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले होते. तेव्हा त्यांच्याजवळ जवळपास चार कोटी रुपयांची संपत्ती होती. यानंतर २०१२ मध्ये डिंपल यांनी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक कनौजधून लढवली. आधी कनौजमधून अखिलेश यादव खासदार होते. परंतु, २०१२ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत डिंपल यादव बिनविरोध जिंकल्या. त्यावेळी डिंपल यांच्याकडे ९ कोटी ३ लाख रुपये संपत्ती होती.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत डिंपल यादव यांनी २८ कोटींहून अधिक संपत्ती सांगितली होती. केवळ दोन वर्षात त्यांची संपत्तीत १९ कोटींहून अधिक वाढ झाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डिंपल यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांच्या संपत्तीत जवळपास ९ कोटी रुपयांची वाढ झाली होती. आता ही संपत्ती वाढून ३७ कोटी ७८ लाखांवर पोहोचली आहे.

Back to top button