नारायणपूर येथे उद्यापासून दत्तजयंती सोहळा | पुढारी

नारायणपूर येथे उद्यापासून दत्तजयंती सोहळा

सासवड; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे दत्तजयंती सोहळा लाखो भाविकांच्या भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. सद्गुरू नारायण महाराज व पोपट महाराज (टेंबे स्वामी) यांच्या अधिपत्याखाली सोमवार (दि. 5) ते बुधवार (दि. 7) या काळात हा भव्य अपूर्व दत्तजयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान सद्गुरू नारायण महाराज यांचे आजोळ हिवरे (ता. पुरंदर) या गावातून आजोळ ज्योतीचे प्रस्थान होऊन दुपारी ही ज्योत नारायणपूर येथे पोहोचेल, तसेच सोहळ्यानिमित्त सोमवारी दुपारी 2 वाजता पालखी दत्त मंदिरातून निघेल व ग्रामप्रदक्षिणा करून 4 वाजता यज्ञस्थळी पोहचेल. यज्ञकुंडात अग्निपूजन होईल.

त्यानंतर दीपपूजा प्रज्वलन होऊन शिवदत्त नामाचे हवन होईल. सायंकाळी अखंड प्रज्वलित अग्नी यज्ञकुंडाचा 22 वा वर्धापन दिन साजरा केला जात असून सायंकाळी पालखी प्रदक्षिणा व 200 कोटी शिवदत्त नामयज्ञ या ठिकाणी होमहवन होईल. दीप प्रदक्षिणा होऊन यज्ञकुंड, अग्नी दर्शन, गंध व घुगर्‍यांचा प्रसाद होईल. त्यानंतर पालखी मंदिरात येईल व आरती होणार आहे.

मंगळवारी (दि. 6) सकाळी 9 वाजता आरती, 4 वाजता पादुकांवर रुद्राभिषेक होईल. दत्त मंदिरात दत्त जन्म सोहळा सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी होणार आहे. त्यापूर्वी दुपारी विविध गावातून येणार्‍या दिंड्यांचे स्वागत केले जाईल, तसेच दत्तजन्माप्रसंगी नारायण महाराज यांचे व्याख्यान, आरती, नाव ठेवणे, पाळणा पुष्पवृष्टी, सुंठवडा वाटप व देव भेटवणे असे कार्यक्रम होणार आहेत.

बुधवारी (दि. 7) दत्तजयंतीचा समारोप दिवस आहे. या दिवशी सकाळी मंदिरात आरती होऊन पालखी ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात होईल. यावेळी विविध पथके, हत्ती, घोडे, उंट, ढोल-लेझीमच्या गजरात पालखी चंद्रभागा स्नानासाठी प्रस्थान ठेवेल. चंद्रभागा स्नान झाल्यानंतर पुन्हा पालखी मंदिरात येऊन या ठिकाणी पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन रात्री 12 वाजता आरतीने सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांनी दिली.

Back to top button