जन आशीर्वाद यात्रेतील चेन चोर टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या | पुढारी

जन आशीर्वाद यात्रेतील चेन चोर टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जन आशीर्वाद यात्रेतील चेन चोर टोळीच्या मुसक्या रत्नागिरी शहर पोलिसांनी आवळल्या. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान चार जणांच्या गळ्यातील सोन्याच्या अडीच लाख रुपयांच्या चेन या टोळीने लांबल्या होत्या. या प्रकरणी सात संशयितांच्या टोळीच्या मुसक्या शहर पोलिसांच्या पथकाने बीडमधून आवळल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कारसह ४ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा मुदेमालही हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दत्ता जाधव, पर्शुराम गायकवाड, दत्ता गुंजाळ(33), सागर कारके(21), नितीन गायकवाड(24), रमेश जाधव(55), बाळू जाधव(28,सर्व रा.बीड) अशी टोळीतील संशयितांची नावे आहेत. 27 ऑगस्ट रोजी संशयितांनी संगनमताने जन आशीर्वाद यात्रेत गर्दीचा फायदा घेत चार जणांच्या खांद्यावर हात ठेवून गळ्यातील ४ चेन कट करुन तसेच पाकिटमारी करुन रोख रकमेसह २ लाख ४१ हजार ८०० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली होती.

या प्रकरणी शहर पोलिसांनी तपास करताना गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेली माहिती व तांत्रिक माहितीच्याआधारे एक-एक दुवा जोडत बीड येथून संशयितांना ताब्यात घेतले. जन आशीर्वाद यात्रेतील चेन चोर टोळीची चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरीतील ३ चेन व रोख रक्कम ६ हजार ८०० तसेच गुन्ह्यातील स्विफ्ट डिझायकर कार व मोबाईल असा एकूण ४ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

संशयित सराईत गुन्हेगार

संशयित हे सराईत गुन्हेगार असून ते ठिकठिकाणी होणार्‍या धार्मिक जत्रा, मेळावे तसेच रॅलींमध्ये सहभागी होऊन अशा प्रकारे चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग, अपर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.एस.भोसले, पोलिस उप निरीक्षक डी.वाय.चव्हाण, पोलिस हवालदार घोसाळे, पोलिस नाईक नार्वेकर, भोसले, घोरपडे, सावंत, भालेकर, शिवलकर, मोहिते, कांबळे, शेख, पोलिस शिपाई माने, पोलिस हवालदार आंबेकर, तसेच पेठबिड पोलिस ठाणे जि.बीड येथील पोलिस हवालदार वाहुळ,पोलिस नाईक मोमीन, क्षीरसागर, पोलिस शिपाई कांबळे आणि महिला पोलिस शिपाई पवार व माने यांनी केली.

हेही वाचले का? 

Back to top button