बारामती : बाललैंगिक अत्याचारप्रकरणी एकास 20 वर्षे सश्रम कारावास | पुढारी

बारामती : बाललैंगिक अत्याचारप्रकरणी एकास 20 वर्षे सश्रम कारावास

बारामती /दौैंड; पुढारी वृत्तसेवा : बाललैंगिक अत्याचारप्रकरणी दाखल खटल्यात गणेश संजय कंपलीकर (रा. नटराज कॉलनीमागे, दर्ग्याजवळ, दौंड) यास बारामती जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांनी 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना 6 एप्रिल 2021 रोजी दौंडमध्ये घडली होती.

पीडिता ही इलायची चिंच खाण्यासाठी दौंडमधील नटराज कॉलनीतील पडीक रेल्वे क्वार्टर येथे गेली असताना गणेश कंपलीकर हा तेथे आला. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी तिने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर तिच्या वडिलांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार कंपलीकर याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. दौंडचे तत्कालीन उपनिरीक्षक एस. एस. लोंढे यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
केले होते.

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सुनील वसेकर यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. पीडितेचे वय नऊ वर्षांचे असूनही तिने धीटपणे न्यायालयात सविस्तर घटना सांगितली. खटल्यामध्ये डॉ. आर. आर. पाखरे यांचा न्यायवैद्यक पुरावा महत्त्वाचा ठरला. वसेकर यांनी केलेला युक्तिवाद, न्यायालयासमोर मांडलेले साक्ष-पुरावे ग्राह्य धरत न्या. शेख यांनी गणेश कंपलीकर याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6 प्रमाणे 20 वर्षे शिक्षा व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तसेच, कलम 10 प्रमाणे पाच वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड व कलम 12 प्रमाणे तीन वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. तसेच, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांना पीडितेस मनोधैर्य योजनेंतर्गत नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. या खटल्यात सरकार पक्षाला दौंडचे प्रभारी पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक फौजदार राजाराम जगताप, एन. ए. नलवडे यांचे सहकार्य झाले.

Back to top button