हिंगोली : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीवर धर्मांतराचा दबाव : तरुणावर गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीवर धर्मांतराचा दबाव : तरुणावर गुन्हा दाखल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : देशभर श्रध्दा हत्याप्रकरण गाजत असताना हिंगोली जिल्हयात एका तरुणीवर लग्नाच्या अमिषाने धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे. रेडगाव येथील तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे शपथपत्र तयार केले. मात्र काही दिवसांतच धर्मांतरासाठी दबाव आणून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून साजीद रफीकखाँ पठाण (रा. जवळा पांचाळ) याच्याविरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, एका २१ वर्षीय तरुणीला जवळापांचाळ येथील साजीद रफीकखाँ पठाण याने लग्नाचे अमिष दाखवून ८ जुलै २०२२ रोजी पळवून नेले. तिच्या कुटुंबियांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. दरम्यान, साजीद पठाण याने तरुणीला डोंगरकडा, जावळाबाजार, औरंगाबाद, फरिदाबाद (दिल्ली) येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

फरिदाबाद येथेच त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपचे शपथपत्र तयार केले. सुमारे दोन महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात ते परत डोंगरकडा येथे येऊन राहू लागले. या वेळी साजीदकडून त्या तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव आणला जात होता. तरुणीने धर्मांतरासाठी विरोध केल्यानंतर तिला त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने साजीदला सोडून देत घर गाठले. घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. बदनामीच्या भीतीने कुटुंबियांनी कुठेही वाच्यता केली नाही. साजीदकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने शुक्रवारी रात्री आखाडा बाळापूर पोलिस ठाणे तक्रार दिली.पोलिसांनी साजीद खाँ पठाण याच्या विरुध्द अत्याचार व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपाधीक्षक किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार शेख बाबर यांच्या पथकाने तातडीने साजीद याला रात्रीच ताब्यात घेतले आहे.

साजीदखाँ पठाण हा सेंट्रीगचे काम करीत होता. साजीदने त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, तिला लग्नाचे अमीष दाखवून पळवून नेले. दोघांनीही फरिदाबाद (दिल्ली) येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे शपथपत्र तयार केले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी शपथपत्र दाखविले.

हेही वाचा :

Back to top button