

करंजी : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या वतीने गाव व वनक्षेत्रातील वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनात भरीव कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरावर दिला जाणारा मानाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2018/19 चा जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील लोहसर ग्रामपंचायतीला राज्यात तृतीय क्रमांक, नाशिक विभागामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळविण्यास आम्ही यशस्वी ठरलो असल्याची माहिती सरपंच हिराताई अनिल गिते यांनी दिली.
राज्यात 29 हजार ग्रामपंचायती असून, त्यात लोहसर ग्रामपंचायतीला राज्यात तृतीय क्रमांक मिळाला. राज्याच्या वतीने 50 हजार रुपयांचे पारितोषिक, तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल विभागाच्या वतीने 50 हजार असे सुमारे एक लाख रुपयांचे पारितोषिक ग्रामपंचायतीला सन्मानपूर्वक मिळणार आहे. हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते समारंभपूर्वक दिला जाणार आहे. लोहसर ग्रामपंचायत ही नगर जिल्ह्यातील प्रथम वनश्री ग्रामपंचायत बहुमान मिळविणारी ग्रामपंचायत ठरली असून, गतकाळात केलेली वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे हे फळ असून, माजी सरपंच अनिल गिते पाटील यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी मोठे परिश्रम व कटू निर्णय घेतले.
सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचे सहकार्य, तसेच वनविभागाच्या अधिकार्यांचे मार्गदर्शन, यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. लोहसर ग्रामपंचायतीने वनविभाग व लोकसहभागातून वनामध्ये, तसेच लोहसर गाव व गावच्या बाजूवरील सर्व रस्त्यांवर वृक्ष लागवड केली. शासनाच्या शतकोटी वृक्षलागवडीमध्ये 80 हजार वृक्षांची लागवड केली. बिहार पॅटर्न योजनेतून लोहसरमध्ये चार रस्त्यांवर चार किलोमीटर परिसरात जवळपास चार हजार वृक्षांची लागवड केली. गावांतर्गत लोकसहभागातून स्मृती वृक्ष योजना राबवून 500 वृक्षांची लागवड केली. वृक्षलागवड वृक्षसंवर्धनाबाबत लोहसर ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील सात ते आठ तालुक्यांमध्ये प्रबोधन रथाच्या माध्यमातून जनजागृती केली. लोहसर वन परिसरामध्ये वृक्षतोडीस बंदी केली. लोहसर येथील ग्रामपंचायत अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती ही जिल्ह्यातील एक सक्षम वन व्यवस्थापन समिती, म्हणून परिचित आहे.
वनांमध्ये वनव्यवस्थापन समितीने पाणवठे तयार केले आहेत. त्याचबरोबर वृक्षतोड होऊ नये, म्हणून लोसर गावांमध्ये वन विभागामार्फत 400 घरगुती गॅसचे वाटप केले आहे. लोहसर ग्रामपंचायतीला 2018 चा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा वनग्राम पुरस्कार मिळाला. लोसर ग्रामपंचायतला 2017-18 चा तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाल्याचे सरपंच हिराताई गिते यांनी सांगितले.