भारत जोडाे यात्रेत चंद्रपूरातील प्रदूषण, वन्यजीव संरक्षणासाठी राहुल गांधींशी चर्चा | पुढारी

भारत जोडाे यात्रेत चंद्रपूरातील प्रदूषण, वन्यजीव संरक्षणासाठी राहुल गांधींशी चर्चा

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरासह देशातील पर्यावरण, निसर्ग, प्रदूषण आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आणि व्यापक धोरणाची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात असून, हिंगोली ते मालेगाव जहागीर (वाशिम) पदयात्रेदरम्यान अध्यक्ष बंडू धोतरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सहभाग घेतला.

पदयात्रेच्या माध्यमाने देशभरातील नागरिकांना प्रत्यक्ष जोडून घेत, विविध भागातील समस्या, प्रश्न आणि नागरिकांचे विचार समजून घेण्याच्या दॄष्टीने, तसेच देशातील विविधता आणि एकता, बंधुभाव कायम राहावा या दॄष्टीने ही पदयात्रा निघाली आहे. देशातील विविध भागातील समस्या, त्याची तीव्रता, नागरिकांची भूमिका याविषयी जाणून घेण्यात येत आहे. यात पर्यावरण विषयक मुद्दे सुद्धा विचारात घ्यावे, अशी विनंती यावेळी बंडू धोतरे यांनी केली. बंडू धोतरे यांच्यासह इको-प्रोचे सहकारी संदीप जीवने, अब्दुल जावेद व देवनाथ गंडाटे सहभागी झाले होते.

दरम्यान, तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत चंद्रपूर येथील इको प्रो संस्था सहभागी झाली. सोबत चालताना चंद्रपूर शहरातील तसेच देशातील प्रदूषण, पर्यावरण, वन्यजीव संवर्धन, त्याचे अधिवास-कॉरिडोर आणि घटते वनक्षेत्र, अधिवास आणि वाढत असलेला मानव-वन्यप्राणी संघर्ष समस्या संदर्भात चर्चा केली. देशातील अनेक शहरे प्रदूषित होत असून, वायु प्रदूषण, नदी-तलाव जलप्रदूषण यासंदर्भात भविष्यातील धोका टाळण्यासाठी व्यापक उपायोजना, नियोजन करीत आपल्या सभोवताल असलेले ‘जल-जंगल-जमीन’ जैव-विविधता विषयक मुद्दे महत्वाचे आहेत.

विकास साधताना “पर्यावरण व मानव” यांचा विचार सुद्धा केला जाणे तितकेच गरजेचे आहे. या दरम्यान त्यांनी विविध विषयांवरील सविस्तर निवेदन राहुल गांधी यांना दिले. महात्मा गांधीच्या तत्त्वावर चालणाऱ्या आणि सामाजिक चळवळ उभी करणाऱ्या विदर्भातील सात सामाजिक कार्यकर्त्यांवर “बीइंग द चेंज” हे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाची प्रत धोतरे यांनी राहुल गांधी यांना भेट म्हणून दिली.

हेही वाचा  

सांगवीत अनधिकृत पार्किंगवर पोलिसांची कारवाई

अबब ! महिलेच्या पोटातून काढली 5 किलो कॅन्सरची गाठ

Supreme Court: ‘आरबीआय अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी’च्या याचिकेवर सीबीआयला उत्तर सादर करण्याचे आदेश

Back to top button