काँग्रेस सत्तेत आल्यास देशाचे विभाजन : पंतप्रधान मोदी

काँग्रेस सत्तेत आल्यास देशाचे विभाजन : पंतप्रधान मोदी

कल्याण/नाशिक; पुढारी वृत्तसेवा : केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास ते देशाचे विभाजन करतील, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण येथील सभेत बोलताना व्यक्त केली. मोदी यांच्या नाशिकमधील पिंपळगाव बसवंतसह कल्याण येथे बुधवारी सभा झाल्या. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान, घाटकोपर येथे त्यांचा रोड शोही झाला.

कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, भिवंडीचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील, तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे मोदी यांची सभा झाली.

पिंपळगाव बसवंत येथील सभेत मोदी म्हणाले, ओबीसी, अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण मुस्लिमांना देऊ पाहणार्‍या काँग्रेसने धर्माच्या आधारावर देशाच्या अर्थसंकल्पाचीही विभागणी करण्याचा डाव रचला होता; पण जोपर्यंत या देशाच्या पंतप्रधानपदावर मोदी आहे तोपर्यंत ना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळेल, ना अर्थसंकल्पाचे विभाजन होईल.

ठाकरे, पवारांवर निशाणा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही मोदी यांनी जोरदार निशाणा साधला. यापूर्वी काँग्रेसच्या सत्ताकाळात शेतकर्‍यांना कुणी वाली नव्हते. महाराष्ट्रातील कृषिमंत्री असूनही शेतकर्‍यांची कुणालाही चिंता नव्हती. काँग्रेसच्या सत्ताकाळात शेतकर्‍यांसाठी खोटे पॅकेज जाहीर केले गेले, अशा शब्दांत मोदी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना नाशिकमधील कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नावर भाष्य केले.

नकली शिवसेना, राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणारच!

नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पक्ष यांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की होणारच आहे. हे जेव्हा होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरेंची येईल. कारण, ते नेहमी म्हणत जेव्हा शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा मी पक्ष बंद करील. नकली शिवसेनेचा विनाश आता जवळ आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्यासाठी हे सारे वेदनादायी आहे. कारण, यांनी त्यांच्या स्वप्नांचे पुरते मातेरे केले, अशा शब्दांत मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण नाकारणार्‍या काँग्रेसला नकली शिवसेनेने डोक्यावर घेतले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दिवसरात्र काँग्रेस शिव्या देत असतानाही नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकले आहेत. राज्यातील जनता या लोकांना शिक्षा देणार आहे, असा दावा मोदींनी केला.

मोदीजी, कांद्यावर बोला!

कांदाफेकीच्या शंकेने धास्तावलेल्या प्रशासनाने सभास्थळी बांधबंदिस्ती करत त्रिस्तरीय तपासणी पद्धत अवलंबिल्यानंतरही केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील कांदा उत्पादकांच्या नाराजीचे पडसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उमटलेच. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर मोदींनी काँग्रेसच्या दिशेने टीकास्त्र सोडले. तेवढ्यात एक शेतकरी मध्येच उभा राहिला. 'मोदीजी, कांद्यावर बोला…' अशा घोषणा या शेतकर्‍याने दोन-तीनवेळा दिल्या. या शेतकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सभास्थळावरून बाहेर नेले.

सव्वाशे दिवसांच्या विकासकामांची ब्ल्यू प्रिंट तयार

कल्याणच्या सभेत मोदी म्हणाले, काँग्रेसकडून जातीयवाद सुरू आहे. त्यांनी नेहमीच हिंदू-मुस्लिम करीत देशाची अखंडता धोक्यात आणली. आमच्या सरकारने काँग्रेसचा जातीयवाद नेहमीच उघडकीस आणला आहे. मोदी सरकारने पहिल्या 125 दिवसांच्या विकासकामांची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे.

ते म्हणाले, काँग्रेस राजवटीत या देशात दहशतवादी खुलेआम फिरत होते. कुठेही फुटणारे बॉम्ब आमच्या सरकारने रोखले. दहशतवादी हल्ले रोखले. यापुढेही देश सुरक्षित ठेवायचा असेल, तर मोदी सरकारची गरज आहे. दहशतवादी या देशात खुलेआम फिरत होते. त्यांचा बंदोबस्त आम्ही केला. काँग्रेस हे पाकिस्तानचे कबुतर आहे. या काँगे्रसवाल्यांना या देशातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या काँग्रेसला निवडणुकीतून हद्दपार करावे लागेल.

यापूर्वीचे सरकार रिमोटवर चालणारे सरकार होते. या सरकारने कोणताच विकास केला नाही. मात्र, आमच्या सरकारने रस्ते विकास, मेट्रो, रेल्वेचे विस्तारीकरण या सगळ्या मुद्द्यांच्या विकासाकडे लक्ष दिले. वेगवान विकास करणारे हे सरकार आहे. मुंबईचा विकास आमच्याच सरकारच्या काळात गतिमान झाला. एका बाजूकडे काँग्रेस मुसलमानांचे लांगूलचालन करते आहे आणि आम्ही सर्वसमावेशक विकासाचा मुद्दा घेऊन काम करत आहोत, असा दावा मोदी यांनी यावेळी केला.

'उबाठा' पाकधार्जिणे : मुख्यमंत्री शिंदे

पराभवाच्या भीतीने इंडिया आघाडी बिथरलेली आहे. त्यांच्या नादी लागून 'उबाठा'नेही पाकिस्तानची हुजरेगिरी सुरू केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा याला 'उबाठा'ने प्रचारात उतरवले. त्यांच्या प्रचार मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकले जातात. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला यावेळी लगावला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news