सांगवीत अनधिकृत पार्किंगवर पोलिसांची कारवाई | पुढारी

सांगवीत अनधिकृत पार्किंगवर पोलिसांची कारवाई

दापोडी : पुढारी वृत्तसेवा :  नवी सांगवी, जुनी सांगवी परिसरात अनधिकृत ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केली जातात. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही दखल न घेतलेल्या सांगवी पोलिस वाहतूक विभागाने मनसेच्या तक्रारीनंतर जुनी सांगवीतील बेकायदा वाहनांवर कारवाई करीत रस्त्यावरील वाहने हटवली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. जुनी सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्र ते माकन हॉस्पिटल चौकादरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कडेला गेल्या सहा महिन्यांपासून वाहने लावली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच होती. तसेच या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले होते.

सांगवी वाहतूक पोलिसांच्या गाड्या दररोज या रस्त्यावरून ये-जा करीत होत्या. मात्र, वाहतूक पोलिसांना इथली बेकायदा वाहने दिसत नव्हती. याचा वाहनचालक व नागरिकांना त्रास होत होता. या ठिकाणच्या वाहतूक कोंडीत काही दिवसांपूर्वी एक रुग्णवाहिका अडकली होती. नागरिकांच्या प्रयत्नांनी रुग्णवाहिकेला मोकळी वाट करून दिली होती. स्मार्ट सिटीअंतर्गत सिमेंट काँक्रीटचा मोठा रस्ता करण्यात आला आहे. या रस्त्यावरून सांगवी फाटा, औंध, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी याकडे ये जा करण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. नियमित या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. बाजारपेठ, बँक, उद्यान यामुळे पादचारी नागरिकांची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या पदपथावर नागरिकांना व्यायामासाठी ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आलेले आहे.

यामुळे व्यायामासाठी या परिसरात मोठी गर्दी असते. मात्र, रस्ता मोठा असूनही केवळ दुतर्फा पार्किंगमुळे नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी व रहदारीसाठी कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यावर दुतर्फा स्कूल बस, चारचाकी वाहने, मालवाहतूक वाहनांच्या पार्किंग केलेल्या रांगा नियमित कायम उभ्या राहत असल्याने रस्ता कशासाठी, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात होता.

सांगवी परिसर हा रहदारीचा रस्ता असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, बेकायदा पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या परिसरात उद्यान, शाळा, बाजारपेठ, बँक आहे. येथे कायम दोन्ही बाजूला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे रस्ता अपुरा होत आहे. वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी नित्य कारवाई सुरू ठेवणे आवश्यक आहे.
                                                         -राजू सावळे, मनसे शहर उपाध्यक्ष

या ठिकाणच्या पार्किंगच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनीही रस्त्याला अडथळा करू नये. अनधिकृत ठिकाणी वाहने उभी करू नयेत, याची खबरदारी घेऊन सहकार्य करावे.
                                 – प्रसाद गोकुळे, वाहतूक पोलिस निरीक्षक, सांगवी विभाग.

Back to top button