कोल्हापूर : डेंग्यूचा डंख तीव्र; रुग्ण संख्येत 80 टक्के वाढ | पुढारी

कोल्हापूर : डेंग्यूचा डंख तीव्र; रुग्ण संख्येत 80 टक्के वाढ

आशिष शिंदे

कोल्हापूर : डासांच्या डंखामुळे जिल्ह्यात दरवर्षी शेकडो नागरिक जीवघेण्या आजारांच्या विळख्यात अडकत आहेत. डंख तीव— झाल्याने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 80 टक्के वाढ झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. ही स्थिती भयावह असून जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात डेंग्यू रुग्णांमध्ये मोठा स्पाईक येण्याची शक्यता आहे. यामुळे डेंग्यू नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात जानेवारी ते मे या कालावधीत 70 डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. यंदा पाच महिन्यांत तब्बल 126 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांचा आलेख चढताच राहिला आहे. यंदा जानेवारी महिन्यात 32 डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर फेब—ुवारीत 28, मार्च 20, एप्रिल 25 तर मेमध्ये 21 रुग्ण आढळले होते.

सीपीआरमध्ये उभारण्यात येणार गप्पी मासे टँक

एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांपासून होणार्‍या जीवघेण्या डेंग्यूबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 16 मेला राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो. डेंग्यू प्रतिबंध सुरक्षित भविष्याची आमची जबाबदारी ही यंदाच्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाची थीम आहे. राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने गुरुवारी (दि.16) सीपीआर रुग्णालयात गप्पी मासे टँक उभारण्यात येणार आहे. तसेच साठलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत.

पावसाळ्यात डेंग्यू रुग्ण वाढण्याचा धोका

साठलेल्या पाण्यामध्ये एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांची उत्पत्ती होते. यामुळेच पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढते. गेल्या वर्षी जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत सर्वाधिक डेंग्यू रुग्णांची नोंद

झाली होती. मात्र, यंदा जानेवारीपासूनच डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ दिसत असल्याने पावसाळ्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Back to top button