अबब ! महिलेच्या पोटातून काढली 5 किलो कॅन्सरची गाठ | पुढारी

अबब ! महिलेच्या पोटातून काढली 5 किलो कॅन्सरची गाठ

पिंपरी : महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) व पदव्युत्तर संस्थेमध्ये 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या पोटातून 5 किलो कॅन्सरची गाठ काढण्यात यश आले आहे. त्यामुळे महिलेचे जगणे सुकर झाले आहे.
चाकण-नाणेकरवाडी येथील भिमाबाई अढाळ (वय 70) या गेल्या दोन वर्षांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या पोटात सतत दुखत होते. तसेच त्यांना जेवल्यानंतर उलटी होण्याचा त्रास होता. वजन कमी होत होते. त्यांनी वेळोवेळी स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखविले. मात्र, त्यांची या त्रासापासुन मुक्तता झाली नाही. खासगी रुग्णालयात होणारा खर्च त्यांना झेपणारा नव्हता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी वायसीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया पथकप्रमुख डॉ. संतोष थोरात यांच्या पथकाला दाखविले. डॉक्टरांनी संपुर्ण तपासणी करुन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले.

आवश्यक असणारे पोटाचे सिटी स्कॅन, सोनोग्राफी, वेगवेगळे ट्युमर मार्कर आदी करून झाल्यावर रेट्रोपेरिटोनियल सारकोमाचे निदान केले. रुग्णाचे वय व खालावत असलेली प्रकृती पाहता त्यांना शस्त्रक्रियेपूर्वी विविध आरोग्यवर्धक औषधे चालू करण्यात आली. तसेच, फिजिओथेरपी देण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी नातेवाईकांना आजाराची पूर्ण माहिती देऊन संभाव्य धोक्याबद्दल अवगत करण्यात आले. त्यांच्या परवानगीने रुग्ण महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

डाव्या किडनीला आली होती सूज

शस्त्रक्रियेदरम्यान पोटामध्ये दोन मोठ्या गाठी काढण्यात आल्या. या कर्करोगाच्या गाठी पोटामध्ये किडनी व मोठ्या आतड्यांवर दाब देऊन त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत होत्या. ज्यामुळे डाव्या किडनीला सूज आली होती. तसेच, कर्करोग पोटाच्या मोठ्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचला होता, असे शस्त्रक्रिया करणार्‍या डॉ. संतोष थोरात यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठ महिला बरी झाली असून पूर्ववत दैनंदिन कार्य करू लागली आहे. शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. बालाजी धायगुडे, सहयोगी प्राध्यापक (शस्त्रक्रिया) डॉ. आनंद झिंगाडे, भूलतज्ज्ञ तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. जितेंद्र वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर व
परिचारिकांचे आभार मानले.

वायसीएममध्ये पदव्युत्तर संस्थेच्या माध्यमातून तसेच अद्ययावत यंत्रणेच्या मदतीने जटील व पूर्वी न केलेल्या शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. ही बाब चांगली आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय व पदव्युत्तर संस्था.

रेट्रोपेरीटोनियल सारकोमा हा दुर्मिळ प्रकारचा कर्करोग आहे. या कर्करोगात झालेली गाठ पूर्णपणे काढणे हाच संपूर्ण उपचार असतो. त्यानुसार ज्येष्ठ महिलेवर उपचार करण्यात आले.
– डॉ. संतोष थोरात, सहयोगी प्राध्यापक, शस्त्रक्रिया विभाग, वायसीएम.

Back to top button