पुणे : कराटेच्या मान्यतेचा वाद समितीच्या ‘कोर्टात’ | पुढारी

पुणे : कराटेच्या मान्यतेचा वाद समितीच्या ‘कोर्टात’

सुनील जगताप

पुणे : राज्यात कराटे खेळामध्ये तीन संघटना अस्तित्वात आल्या असून प्रत्येक संघटना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (एमओए) च्या मान्यतेसाठी लढा देत आहे. कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांची
मान्यता असूनही त्यांना डावलले गेल्याचा त्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे हा वाद समितीच्या ‘कोर्टात’ गेला आहे.

भारतीय कराटे संघटनेकडून अधिकृत असलेल्या संघटनेला मान्यता न देता अनाधिकृत संघटनेला मान्यता देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केला असून मान्यता नसलेल्या  महाराष्ट्र कराटे असोसिएशनला एमओएने मान्यता एक वर्षासाठी दिली आहे. त्यामुळे हा वाद एमओएच्या अध्यक्षांपर्यंत गेला असून त्यांनी वाद मिटविण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या मान्यतेचा वाद आता समितीच्या निर्णयावरच अवलंबून असून त्यांच्या अहवालानंतरच खर्‍या कराटे संघटनेचे चित्र समोर येणार आहे.

आमच्या संघटनेला न्याय मिळणे अपेक्षित
कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेला भारतीय कराटे आणि आंतरराष्ट्रीय संघटनेची मान्यता आहे. तशी कागदपत्रेही एमओएला सादर केलेली आहेत. परंतु, अद्यापही आमच्या संघटनेला एमओएने मान्यता दिलेली नाही. ज्या संघटनेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांची मान्यताच नाही त्याच बरोबर त्यांचे राज्यातही सभासद नाहीत अशा संघटनेला मान्यता दिली असून ही बाब चुकीची आहे. त्यामुळे समितीनेही कागदपत्रांचा अभ्यास करून योग्य तो न्याय द्यावा.
                                                             – सलाउद्दिन अन्सारी
                                           (अध्यक्ष, कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र)

समितीच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा
राज्यात कराटेच्या तीन संघटना झालेल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्र कराटे असोसिएशनलाच मान्यता होती. तर केंद्रातही कराटेच्या अनेक संघटना झालेल्या असून इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनकडे ही मान्यतेचा वाद सुरू आहे. त्यामुळे कोणती संघटना अधिकृत हे ठरलेले नाही परंतु, सुरुवातीपासून मान्यता असलेल्या संघटनेलाच मान्यता दिली आहे. एमओएकडे समिती नेमण्यात आली असून ही समिती सर्व कागदपत्रांची तपासणी करून अहवाल सादर करेल. या अहवालावर एमओएच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.
                                                      – नामदेव शिरगावकर
                                 (सरचिटणीस, महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन)

Back to top button