राहुरी : राजमाता पतसंस्थेच्या ठेवीदाराचा झाला मृत्यू | पुढारी

राहुरी : राजमाता पतसंस्थेच्या ठेवीदाराचा झाला मृत्यू

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी येथील राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे ठेवीदार गोरक्षनाथ औटी यांचे आज (गुरुवारी) सकाळी -हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दरम्यान, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले संचालक मंडळासह सहाय्यक निबंधकावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही. असा पवित्रा स्व. औटी यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. राहुरी शहरातील राजमाता जिजाऊ पतसंस्थेत 7 कोटी 37 लाख 62 हजार रूपयांचा अपहार झाल्याचे सिद्ध झाले.

त्यानुसार चेअरमन व व्हा. चेअरमनसह 9 जणांवर फसवणुकीचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. यातील सर्व संशयित पसार आहेत. दोन दिवसांपूर्वी ठेवीदारांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वच संचालकांना आरोपी करण्याची मागणी केली होती. या प्रकाराबाबत सर्व ठेवीदार काल सायंकाळी सहाय्यक निबंधक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यामध्ये गोरक्षनाथ औटी हे देखील होते. यावेळी ठेवीदार व सहाय्यक निबंधक यांची चर्चा झाली नाही. याचा मानसीक ताण गोरक्षनाथ औटी यांच्यावर आल्याचे समजले. राजमाता जिजाऊ पतसंस्थेत औटी यांचे पैसे अडकले होते. काबाडकष्ट करून एकेक रूपया जमा करून त्यांनी घर बांधण्यास जमा केलेली रक्कम पतसंस्थेत ठेवली होती. पतसंस्था तोट्यात आल्याने पैसे मिळणार कि नाही, याचीच चिंता औटी यांना गेल्या वर्षांपासून भेडसावत होती.

Back to top button