..अबब सलाईनमधून औषध गळती, अकोले ग्रामीण रुग्णालयाचा अजब कारभार | पुढारी

..अबब सलाईनमधून औषध गळती, अकोले ग्रामीण रुग्णालयाचा अजब कारभार

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  येथील ग्रामीण रुग्णालयात सलाईन उपलब्ध नसल्याने विकत आणुन महिलेस लावलेल्या सलाईनमधुन औषध गळत असल्याचा प्रकार समजताच आ.डॉ. किरण लहामटे यांनी रुग्णालयाची झाडाझडती घेतली. याप्रकाराबाबत नाराजी व्यक्त करीत रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांना कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आदिवासी तालुका अशी ओळख असणार्‍या अकोले तालुक्यात रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करते, परंतु ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने उपचारास आलेल्या महिलेने मेडिकलमधून सलाईन आणले. आजारी महिलेस उपचारादरम्यान ग्रामीण रुग्णालयात सलाईन लावले, मात्र वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकेच्या दुर्लक्षामुळे सलाईनमधुन औषध खाली पडत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा अकोले ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. किरण लहामटे यांनी ग्रामीण रुग्णालयात अचानक भेट देऊन औषधसाठा, बाथरूम व रुग्णालयातील सोई सुविधांची पाहणी करीत बेडच्या स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात घडलेल्या या प्रकारासह रुग्णांना सोयी- सुविधा व औषध तुटवड्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत रुग्णांनावर आवश्यक उपचार मिळावेत. रुग्णालयातील कारभार सुधारला पाहिजे अन्यथा कामात हलगर्जीपणा करणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी आ. डॉ.किरण लहामटे यांनी केली आहे.

रुग्णालयाणील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना कामात सुधारणा करुन रुग्णांना सेवा देणाचा मौलिक सल्ला आ.डॉ. लहामटे यांनी दिला. रुग्णांना विनामूल्य आरोग्य सेवा मिळावी, या उदात्त हेतूने ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली, मात्र रुग्णसेवा न करता वरचेवर उपचार करून त्यांच्या आरोग्याशी खेळण्याच्या या घटनेमुळे रुग्णांच्या आरोग्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या जिविताशी खेळतात.

रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी 4 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सकाळी केवळ हजेरी लावुन घरी जातात. ‘सरकार अंगठा देऊन घरी जा,’ असे म्हणत नाही. रुग्णालयात यापुढे अंगठा देऊन घरी जाणारे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचार्‍यांना कायमचे घरी पाठवण्याची व्यवस्था मी करणार आहे.
                                                               – आ.डॉ. किरण लहामटे

Back to top button